महिलांच्या सुरक्षेचा विषय आला की आपण हमखास म्हणतो, “आता व्यवस्था बदलली आहे, सुविधा वाढल्या आहेत.” गाड्यांमध्ये जीपीएस आहे, आपत्कालीन बटण आहे, हेल्पलाईन क्रमांक आहेत. (Taxi driver in Mumbai Says the Emergency Button Won’t Work – Is Women’s Safety Just a Myth?)पण जर प्रत्यक्ष गरजेच्या वेळीच या सुविधा काम करत नसतील तर? हाच प्रश्न सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका टॅक्सी ड्रायव्हरच्या व्हिडिओमुळे चर्चेत आला.
या व्हिडिओमध्ये चालक असा दावा करताना दिसतो की महिलांच्या मदतीसाठी गाडीत आपत्कालीन बटण तर आहे. कंपनी आम्ही महिलांसाठी सुविधा पुरवतो, काही गडबड असली तर त्यांच्या मदतीला लगेच जातो असे दावे करतात. त्यावरुन जाहिरात करतात.मात्र ती केवळ औपचारिकताच. प्रत्यक्षात तुमच्या सुरक्षित असण्या - नसण्याचा त्यांना काही फरक पडत नाही. ड्रायव्हरने सांगितल्यानुसार, तो रात्री उशिरापर्यंत घोडबंदर रोडवर थांबून वारंवार ते बटण दाबत बसला होता. नक्की काय होतं जाणून घेण्यासाठी तो त्या बटणाशी खेळत होता. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ना फोन, ना मदतीचा संदेश. या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी या घटनेने महिला सुरक्षेच्या यंत्रणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
महिला सुरक्षा ही केवळ तांत्रिक सुविधांवर अवलंबून नसते. बटण बसवणे, सीसीटीव्ही लावणे किंवा अॅप तयार करणे ही सुरुवात असते, पण त्यामागची प्रणाली तत्पर आणि उत्तरदायी असणे अधिक महत्त्वाचे असते. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. प्रतिसाद उशिरा मिळाल्यास त्या सुविधेला अर्थच उरत नाही. असे असेल तर त्याला आपत्कालीन सुविधा म्हणण्यात काडीमात्र अर्थ नाही. या चर्चेला अधिक गती मिळाली कारण सोशल मिडियावरील हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे हा मुद्दा व्यापक स्तरावर पोहोचला आणि अनेकांनी यंत्रणांची तपासणी करण्याची मागणी केली.
या सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विश्वास. महिलांना सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रात्री प्रवास करताना सुरक्षित वाटणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ साधने पुरेशी नाहीत, तर पारदर्शक व्यवस्था, नियमित तपासणी आणि जबाबदारीची जाणीव आवश्यक आहे. महिला सुरक्षा हा केवळ घोषणांचा विषय नसून तो कृतीतून सिद्ध व्हायला हवा.
