स्वयंपाकघरात आपण रोज चपाती, पराठे किंवा डोसे बनवण्यासाठी तव्याचा वापर करतो. पण वारंवार तेल आणि तुपाचा वापर केल्यामुळे तव्यावर हळूहळू तेलकट आणि जळलेला थर साचू लागतो.(Clean burnt pan) सुरुवातीला आपण याकडे दुर्लक्ष करतो पण काही दिवसांनी हा थर इतका घट्ट होतो की साध्या साबणाने किंवा लिक्विडने तो निघत नाही.(Remove black stains from pan) तवा काळाकुट्ट दिसतो, त्यावर बनवलेले पदार्थही चिकट लागतात. अनेकदा आपण तवा घासून घासून दमतो, पण त्याचा तेलकटपणा जात नाही. अशा वेळी वाटतं की आता हा तवा फेकून देऊन नवाच विकत घ्यावा लागेल का?
तव्यावरची साचलेली वर्षानुवर्षांची चिकट घाण आणि जळलेला थर काढण्यासाठी तुम्हाला महागड्या क्लीनर्सची किंवा तासन् तास घासाघाशीची गरज नाही. आपल्या घरात उपलब्ध असलेल्या अगदी साध्या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचा लोखंडी किंवा नॉन-स्टिक तवा पुन्हा एकदा नव्यासारखा चमकवू शकता. पाहूया, सोपा घरगुती उपाय.
तवा स्वच्छ करण्यासाठी आपल्याला लिंबू, बेकिंग सोडा आणि मीठ लागेल. १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा मीठ, अर्धा कापलेला लिंबू, थोडे गरम पाणी लागेल.
सर्वात आधी गॅस सुरु करुन तवा मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे चांगला गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावरचा घट्ट झालेला तेलाचा थर हळूहळू कमी होईल. गरम तव्यावर सर्व बाजूंनी बेकिंग सोडा आणि मीठ पसरवा. बेकिंग सोडा हा उत्तम 'क्लींजिंग एजंट' आहे, तर मीठ 'स्क्रबर' सारखे काम करते जे तव्यावर साचलेली घाण काढण्यास मदत करते.
अर्धा कापलेले लिंबू घेऊन तव्यावर जोराने घासा. लिंबाचा रस जेव्हा सोड्यावर पडतो, तेव्हा तिथे रासायनिक प्रक्रिया होऊन बुडबुडे तयार होतात. हे मिश्रण तव्यावरच्या काळ्या थरामध्ये खोलवर शिरते आणि तो थर निघण्यास सुरुवात होते. कडांच्या बाजूला जिथे जास्त घाण असते, तिथे लिंबाच्या सालीने दाब देऊन घासा. हे मिश्रण तव्यावर लावून ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या. जर थर खूपच जुना असेल, तर त्यावर थोडे गरम पाणी शिंपडा.
जुना चमचा किंवा सुरी घेऊन हलक्या हाताने कडा खरवडा.काळा थर अगदी सहज पापडीसारखा निघून येईल. नंतर साबणाने तवा घासून घ्या. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तव्यावर कधीच थर साचणार नाही.
