माधुरी पेठकर
नोकरी करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, स्वत:च्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी बायकांची धडपड सुरू असते. नोकरी करून घर, मुलं सांभाळण्याची लढाई आनंदाने लढणाऱ्या बायका जगभरात भेटतात; पण आठ-दहा तास ऑफिसमध्ये राबणं, पैसे कमावणं, त्यासाठी दिवसभर धावपळ करणं हे नाकारून शांतपणे जगण्यासाठी नोकरी सोडण्याचं पाऊल उचलणाऱ्या बायका मात्र स्वीडनमध्ये भेटतात. त्यांचा हा निर्णय ‘साॅफ्ट गर्ल ट्रेण्ड’ नावाने जगभरात चर्चेचा विषय झाला आहे.
एके काळी स्वीडनमधील महिलांनी लढून काम करण्याचा, आर्थिक स्वातंत्र्याचा हक्क मिळवला होता. त्याच स्वीडनमधील अनेक नोकरदार महिलांना आता आर्थिक स्वातंत्र्यापेक्षाही शांत जगणं महत्त्वाचं वाटू लागलं आहे.
व्हिल्मा लार्सन ही २५ वर्षांची तरुणी. तिने अनेक ठिकाणी नोकरी केली. तिच्या मते तिला त्यातून पैसे मिळाले; पण ते मिळवताना मनाप्रमाणे जगण्याचं स्वातंत्र्य मात्र मिळालं नाही. म्हणूनच तिने वर्षभरापूर्वी नोकरी सोडून दिली. ज्या मित्रासोबत
ती राहते तो नोकरी करतो. व्हिल्माला हवे असलेले पैसे तो त्याच्या कमाईतून तिला देतो.
लार्सनने आपल्या आजीला, आईला नोकरी आणि घराच्या चक्रात पिळून निघताना बघितलेलं होतं. तिला स्वत:ला तिची अशी अवस्था होणे नको होते म्हणून चांगल्या पगाराची नोकरी तिने सोडून दिली. अशा अनेकजणी, म्हणून आता या गोष्टीला ‘साॅफ्ट गर्ल’ ट्रेण्ड म्हटले जातेय.
आपल्या जोडीदाराच्या पैशावर जगण्याचा पर्याय स्वीकारून महिला स्वत:ला मागे नेत आहेत. लिंगसमानतेच्या बाबतीत जगात सर्वांत पुढे असणाऱ्या देशात बायका नोकरी सोडून देण्याचा पर्याय स्वीकारत आहे, अशीही चर्चा आहेच. त्यामुळे या ट्रेण्डवर टीका होत आहे. मात्र, तरी नोकरी सोडून अनेकजणी घरी बसत आहेत. त्या म्हणतात आता आम्हाला निवांत जगायचं आहे.