Join us

कमाल! फिजिक्सच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने लिहीली चक्क बॉलिवूडची गाणी; शिक्षकांनी शेअर केला उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2023 13:31 IST

Student Wrote Bollywood Viral Video of Physics Answer sheet : शिक्षकांनी रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ अली जफर यांनी स्वत:ही आपल्या ट्विटरवर शेअर केला

ठळक मुद्देआपण फिजिक्सच्या तासाला झोपा काढतो म्हणून आपल्याला उत्तरे येत नसल्याचेही या विद्यार्थ्याने पुढच्या एका प्रश्नाच्या उत्तरात लिहीले आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिल्याचे दिसते.

आपण शिकून मोठं व्हावं आणि स्वत:च्या पायावर उभं राहावं म्हणून पालक जीवाचं रान करतात. प्रसंगी पदरमोड करुन आपल्याला शिकवतात. पण प्रत्येकाला याची जाण असतेच असं नाही. तरुण वयात अंगात असलेली उर्मी आणि शिक्षणाचे नसलेले गांभिर्य यामुळे मग परीक्षेत नापास होण्याची वेळ येते आणि वर्ष वाया जाते. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये एका विद्यार्थ्याने परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत चक्क बॉलिवूडमधील गाणी उत्तर म्हणून लिहीली आहेत. एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर मनाने काही लिहीणे किंवा प्रश्न सोडून देणे असे आपण करतो. पण अशाप्रकारे गाणी लिहीणाऱ्या विद्यार्थ्याच्या आगाऊपणाला काय म्हणावे (Student Wrote Bollywood Viral Video of Physics Answer sheet).

बॉलिवूडची गाणी लिहीलेल्या उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ तपासणाऱ्या शिक्षकांनी रेकॉर्ड केला आहे. ही घटना पाकिस्तानमध्ये घडली असून फिजिक्सच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने सिंगर अली जफरचे “ओ ओ जाने जाना, ढुंढे तुझे दिवाना...” हे गाणे पूर्ण पेपरभर लिहून ठेवले आहे. शिक्षकांनी रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ अली जफर यांनी स्वत:ही आपल्या ट्विटरवर शेअर केला असून असे करु नका असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. हा व्हिडिओ मला व्हॉटसअॅपवर मिळाला असे अली जफर यांनी म्हटले आहे. या गाण्याचे शब्द फिजिक्सशी निगडीत असले तरी अभ्यास करताना फक्त अभ्यासावर लक्ष हवे आणि शिक्षकांचा आदर करा असेही त्यांनी सांगितले आहे. 

ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ १.३ मिनीटांचा असून यामध्ये शिक्षक विद्यार्थ्याने कशाप्रकारे गाणे लिहीले आहे हे दाखवत आहेत. तर जवळपास ७० हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिल्याचे दिसते. कराचीमधील एका शाळेतील विद्यार्थ्याने हे कृत्य केले असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. “मैने तुझे देखा, हंसते हुए गालों पे..” आणि “ओ ओ जाने जाना, ढुंढे तुझे दिवाना...” या दोन्ही गाण्यांचे लिरीक्स यामध्ये लिहीण्यात आल्याचे दिसते. पेपरची पूर्ण पाने गाण्याने भरली असून विद्यार्थ्याने गाण्याच्या मधे असलेले म्युझिकही यात लिहीले आहे. आपण फिजिक्सच्या तासाला झोपा काढतो म्हणून आपल्याला उत्तरे येत नसल्याचेही या विद्यार्थ्याने पुढच्या एका प्रश्नाच्या उत्तरात लिहीले आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया