Cloth Cleaning Tips : कॉटनचे कपडे घालणं बहुतेकांना आवडतं. हे हलके आणि आरामदायी असतातच, शिवाय दिसायलाही छान वाटतात. पण कॉटनचे कपडे खासकरून गडद रंगाचे लवकर रंग सोडतात. कपडे धुताना त्यांचा रंग हळूहळू निघत जातो. त्यामुळे दोन-तीन धुतल्यावरच ते जुने वाटू लागतात. जर तुमच्यासोबतही असं होत असेल, तर हे उपाय तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. या सोप्या ट्रिकने तुम्ही कॉटनच्या कपड्यांचा रंग टिकवू शकता.
काय आहे ही ट्रिक?
ही सोपी ट्रिक डिजिटल क्रिएटर पूनम दिवाणी यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केली आहे. त्या नेहमी घरगुती, सोप्या आणि प्रभावी टिप्स सोशल मीडियावर शेअर करतात. यामध्ये त्यांनी कॉटन कपड्यांचा रंग टिकवून ठेवण्याचा सोपा उपाय सांगितला आहे.
काय करायचं?
आधी तर 10 ते 12 लिटर पाण्याचं एक मोठा भांड घ्या. त्यात अंदाजे 50–60 ग्रॅम तुटी मिक्स करा. नंतर या पाण्यात दोन मूठ मीठ टाका. आता ज्यांचे रंग टिकवायचे आहेत असे कपडे या पाण्यात टाका. तुम्ही हवे तर एकाचवेळी अनेक कपडे भिजवू शकता. कपड्यांना किमान 2 तास या पाण्यात भिजू द्या. दोन तासांनंतर स्वच्छ पाण्याने कपडे चांगले धुवा, जेणेकरून मीठ व तुरटी पूर्ण निघून जाईल. पहिल्यांदा धुतल्यावर कपडे थोडा रंग सोडू शकतात, पण नंतर त्यांचा रंग पक्का होईल व दुसऱ्या कपड्यांवर लागणार नाही.
आणखी एक ट्रिक
हा उपाय करून झाल्यावर काही वेळासाठी कपडे थोडे कडक होतात. त्यासाठी पूनम दिवाणी यांनी अजून एक उपाय सांगितला आहे. एक बकेट पाण्यात 2 चमचे व्हिनेगर टाका. त्यात कपडे अर्धा तास भिजवा. व्हिनेगरमुळे कपडे मऊ होतात आणि त्यांचा रंग आणखी जास्त टिकतो. त्यानंतर कपडे हलक्या उन्हात वाळवा.
फायदे
या उपायाने तुमचे कॉटनचे कपडे ना रंग सोडतील, ना आकसतील, आणि प्रिंटसुद्धा ताजेतवाणे व चमकदार राहतील. हा उपाय तुम्ही सूट, साडी, बेडशीट किंवा इतर कोणत्याही कॉटनच्या कपड्यांवर करू शकता.