Cleaning Tips : पावसाळा संपल्यानंतर भिंतींवर आणि फरशीवर शेवाळ जमा होतं. हे केवळ दिसायला वाईट वाटत नाही तर त्यामुळं आपण किंवा घरातील लहान मुलं घसरून पडण्याचा धोकाही वाढतो. अशात ही समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो. या उपायांनी काही मिनिटात भिंती आणि फरशीवरील जमा झालेला थर दूर होऊ शकतो. असेच पाच उपाय आज आपण पाहणार आहोत.
व्हिनेगर आणि पाणी
व्हिनेगरमधील आम्लीय तत्व शेवाळ काढण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. एका स्प्रे बॉटलमध्ये समान प्रमाणात व्हिनेगर आणि पाणी मिक्स करा. हे मिश्रण थेट शेवाळावर स्प्रे करा आणि १५ ते २० मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर ब्रशने चांगलं घासून स्वच्छ धुवा.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा सुद्धा एक उत्तम घरगुती उपाय आहे. ज्याचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. थोड्या पाण्यात बेकिंग सोडा पाण्यात मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट शेवाळावर लावून काही तासांसाठी तशीच राहू द्या. नंतर ब्रशने घासून पाणी टाकून धुवा.
ब्लीचींग पावडर किंवा क्लोरीन
जर शेवाळ खूप जास्त असेल, तर ब्लीचींग पावडर किंवा क्लोरीन वापरता येईल. मात्र हे करताना हातात ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे. थोडं ब्लीचींग पावडर शेवाळावर शिंपडा, पाण्यानं ओलसर करा आणि काही वेळ तसेच ठेवा. नंतर ब्रशनं घासून भरपूर पाण्याने धुवा.
गरम पाणी आणि डिटर्जंट
हा सुद्धा एक सोपा आणि फायदेशीर उपाय आहे. एका बकेटीत गरम पाण्यात थोडं डिटर्जंट किंवा डिशवॉश लिक्विड मिसळा. हे मिश्रण शेवाळावर टाका आणि लगेच झाडू किंवा ब्रशने घासून टाका. गरम पाण्यामुळे शेवाळाची पकड सैल होते आणि ती सहज निघून जातं.
मीठ आणि लिंबाचा पेस्ट
लिंबातील आम्लीय गुणधर्म आणि मिठाचा खरखरीतपणा मिळून शेवाळ किंवा फरशीवरील चिकटपणा काढण्यासाठी उत्तम उपाय ठरतो. एका वाटीत लिंबाचा रस आणि मीठ मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट शेवाळावर लावून १५ ते २० मिनिटं ठेवा. नंतर ब्रशनं घासून पाण्याने स्वच्छ धुवा.