Join us

Axiom Mission-4 : शुभांशू शुक्ला अंतराळात घेऊन गेले मेथी आणि मूग, तिथं रुजवणार बी कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2025 17:47 IST

Axiom Mission-4: भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या ऑक्सिओम मोहिमेला सुरुवात झाली असून यामध्ये शुभांशू शुक्ला शेतीसंबंधी खूप वेगळा प्रयोग करणार आहेत..

ठळक मुद्दे हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यासाठी ती निश्चितच खूप महत्त्वाची बाब ठरणार आहे. 

भारताच्या इतिहासात गौरवपुर्ण शब्दांनी नोंद केली जावी असा क्षण Axiom Mission-4 या निमित्ताने पुन्हा एकदा आला आणि शुभांशू शुक्ला इतर अंतराळवीरांसह अवकाशात झेपावले. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी खरोखरच अतिशय अभिमानाचा आहे. जसे प्रत्येक अंतराळ मोहिमेदरम्यान काही प्रयोग केले जातात तसेच काही प्रयोग ऑक्सिओम या मोहिमेतही केले जाणार आहेत. पण त्या प्रयोगांपैकी एक प्रयोग अतिशय वेगळा असून तो शुभांशू शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली केला जात आहे. या प्रयोगामध्ये अंतराळात चक्क मेथी आणि मूग उगविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

कसा असणार हा प्रयोग आणि काय त्याचे उद्दिष्ट?

आपल्याला माहितीच आहे की अंतराळात गुरुत्वाकर्षण खूप कमी असते. त्यामुळे ज्याप्रमाणे पृथ्वीवर ही रोपे उगवताना जसे पोषक वातावरण असते, तसे तिथे नसणार. त्यामुळेच हा प्रयोग आव्हानात्मक ठरणार आहे. अंकुरीत करण्यात आलेली रोपे अंतराळवीरांसह पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांच्यावर सखोल अभ्यास करण्यात येईल. रोपाची वाढ कशी झाली, तसेच त्यांच्यातील काही जेनेटिक्स बदलले आहेत का, त्यांच्यामध्ये असणारे पोषणमुल्य वाढले की कमी झाले, अशा कितीतरी गोष्टी या प्रयोगात तपासण्यात येणार आहेत. मेथी आणि मूग हे दोन्हीही खूप पौष्टिक असल्याने त्यांची निवड करण्यात असं ISRO चे मायक्रोग्रॅव्हीटी रिसर्च प्रमुख तुषार फडनीस यांनी एका व्हर्च्युअल प्रेस मीटमध्ये म्हटलं आहे.  

 

हा प्रयोग करण्याचा एक उद्देश असाही आहे की भविष्यात नेहमीच अंतराळ मोहिमा होणार. त्यामुळे अंतराळवीर फ्रेश धान्य उगवून त्यांच्या खाण्याची व्यवस्था करू शकतात का, हे पाहणे आहे. काही मोहिमा खूप जास्त काळासाठी असतात. अशावेळी अंतराळवीरांना पृथ्वीवरून खाद्यपदार्थ पोहोचविणे कठीण असते आणि त्यासाठीही खूप वेळ लागतो. हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यासाठी ती निश्चितच खूप महत्त्वाची बाब ठरणार आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलनासा