स्वयंपाकघरात गॅस सिलेंडरचा वापर हा रोजच्या जीवनाचा भाग आहे. मात्र सोयीबरोबरच यामध्ये सुरक्षिततेची जबाबदारीही तितकीच मोठी असते. गॅस ज्वलनशील असल्यामुळे लहानशी चूकही कधी कधी महागात पडू शकते. ( See what precautions to take when using gas cylinders, never make these mistakes )म्हणूनच गॅस सिलेंडर वापरताना काही गोष्टी आणि नियम पाळणे अत्यंत गरजेचे ठरते.
गॅस सिलेंडर नेहमी हवेशीर जागेत ठेवावा. बंद कपाटात, जिन्याखाली किंवा फारच अरुंद जागेत सिलेंडर ठेवणे टाळावे. गॅस गळती झाल्यास हवेशीर जागेमुळे गॅस साचत नाही आणि अपघाताचा धोका कमी होतो. सिलेंडर नेहमी उभ्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे.स्वयंपाक करताना रेग्युलेटर आणि रबर पाईपची स्थिती तपासणे ही सवय असावी. रबर पाईप फार जुना, कडक किंवा तडे गेलेला असल्यास त्वरित बदला. साधारणपणे रबर पाईप दर दीड-दोन वर्षांनी बदलणे गरजेचे मानले जाते. रेग्युलेटर सैल झाला आहे का, नीट बसलेला आहे का, हेही वेळोवेळी पाहणे गरजेचे असते.
गॅसचा वास येत असल्यास अजिबात घाबरु नये, पण निष्काळजीपणाही दाखवू नये. अशावेळी लगेच रेग्युलेटर बंद करावा, खिडक्या-दारे उघडून हवा खेळती करावी. कोणतेही विद्युत स्विच, पंखा किंवा लाईट चालू-बंद करू नये, कारण त्यातून ठिणगी पडू शकते. माचिस, अगरबत्ती किंवा दिवा पेटवणेही पूर्णपणे टाळावे. आधी तज्ज्ञाला बोलवून तापासून घ्यावे मगच इतर कामांना सुरवात करावी. स्वयंपाकघरात गॅसजवळ ज्वलनशील वस्तू ठेवू नयेत. पडदे, कागद, प्लास्टिकच्या वस्तू किंवा तेलकट कापड गॅसजवळ असल्यास आग लागण्याचा धोका वाढतो. लहान मुलांना गॅसजवळ एकटे सोडणे किंवा स्टोव्हशी खेळू देणे टाळावे. गॅस शेकडीच्या जवळ असणे स्वाभाविक असले तरी अगदी टेकवून ठेवण्यापेक्षा जेवढा जमेल तेवढा लांब ठेवा.
गॅस सिलेंडर बदलताना तो अधिकृत वितरकाकडूनच घेतला आहे का, सील नीट आहे का, हे तपासणे आवश्यक असते.
एकूणच, गॅस सिलेंडरचा वापर करताना फार मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा काही मूलभूत नियम सातत्याने लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. थोडीशी जागरुकता आणि शिस्त अपघात टाळू शकतात आणि घरातील सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित करु शकतात.
