Join us  

छतातून टपटप पाणी गळतंय, ३ उपाय- छत गळण्याची समस्या होईल कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2023 2:03 PM

Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips : गळणारे घर आपल्याला वेळीच सावरता यावे यासाठी आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत.

पावसाळा जवळ आला की आपण घराची आधीच डागडुजी करुन घेतो. गॅलरीचे किंवा खिडक्यांच्या पत्र्यातून पाणी गळत असेल, कुठून ओल येत असेल तर आपण ते ठिकठाक करुन घेतो. जेणेकरुन ऐन पावसाळ्यात आपल्याला गळतीच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. ही कामं वेळच्या वेळी करुन घेतलेली असतील तरीही पाऊस सुरु झाला की व्हायचे ते होतेच आणि घराचे किंवा गॅलरीचे पत्र गळायला लागतात. मग घरभर पाणी होऊ नये म्हणून आपण त्याखाली बादल्या लाव, फडकी पसरुन ठेव असे काही ना काही तात्पुरते उपाय करतो (Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips) . 

मात्र जोरदार पाऊस आला आणि आपण त्यावेळी घरात नसलो तर आपल्याला आता घराचे काय होणार याचे टेन्शन राहते. असे सगळे होऊ नये आणि गळणारे घर आपल्याला वेळीच सावरता यावे यासाठी आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. जेणेकरुन आपली ऐनवेळी धांदल होणार नाही आणि सगळीकडे पाण्याने राडाही होणार नाही. पाहूयात हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे. 

(Image : Google)

१. गळणारी जागा नीट तपासा

घराचे किंवा गॅलरीचे छत ज्याठिकाणी गळत आहे तो क्रॅक मोठा आहे की लहान हे तपासा. क्रॅकची व्याप्ती किती आहे यावरुन आपल्याला त्यावर नेमका काय उपाय करायचा याचा अंदाज येऊ शकेल. म्हणूनच स्वत: प्रत्यक्ष वर चढून ही जागा किती लहान किंवा मोठी आहे ते तपासायला हवे. छत गळत असताना त्यावर कोणत्याही प्रकारचे काम करता येत नाही. त्यामुळे पाऊस थोडा कमी होण्याची वाट पाहून तो कमी झाल्यावर लगेच हा भाग कोरडा करुन घेणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्याला किंवा संबंधित व्यक्तीला पुढचे काम करणे सोपे जाते. ओल्या छतावर कोणतीही गोष्ट लावली तरी ती सेट होऊ शकत नाही. त्यामुळे ही जागा शक्य तितकी कोरडी कशी होईल याची काळजी घ्यायला हवी. 

२. घरच्या घरी करता येईल हा सोपा उपाय

अर्ध्यामिमीपेक्षा छोटे जे क्रॅक्स आहेत त्या सगळ्यांवर डॉक्टर फिक्सिट मिसळलेले सिमेंट ब्रशने लावल्यास ते सहज कव्हर होते आणि लिकेज थांबते. मोठ्या भेगांमधे पत्र्याने  भेगा उसवायच्या आणि त्यात डॉक्टर फिक्सिट मिसळलेले सिमेंट काळजीपूर्वक भरून घ्यायचे आणि परत वर ब्रशने लावायचे. याचा दिर्घकाळसाठी फायदा होतो. 

(Image : Google)

३. सिमेंटचा वापर करुन घरीच करा डागडुजी 

सिमेंट, पेट्रोल आणि थर्माकोलचे तुकडे एकत्र करुन ते छताच्या गळणाऱ्या भागावर लावायला हवे. त्यामुळे भाग बंद होण्यास चांगली मदत होईल. तसेच हे सिमेंट कशापद्धतीने भिजवायचे याची नीट माहिती घेऊन मगच पुढचे काम करा. याशिवाय हे काम करताना हातमोजे घालायला विसरुन नका. म्हणजे तुमच्या हातांना कोणतीही इजा होणार नाही. लहान मुले, ज्येष्ठ मंडळी यांना यापासून दूर ठेवणे केव्हाही जास्त हिताचे.   

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनपाणीमानसून स्पेशल