शाळकरी मुलांच्या हातात मोबाइल असणे आता अगदी सामान्य आहे. १२ - १३ वर्षापासूनच मुलं मोबाइल, लॅपटॉप, आयपॅड वापरतात, त्यामध्ये पारंगत होतात. या उलट जुनी पिढी मोबाइलचा वापर संपर्क करण्यासाठी करते. (parenting tips, Why do young people say no phone calls these days? Some of the reasons are serious..)वॉट्सअप, इंस्टाग्राम तर सगळेच वापरतात, पण मुख्य उद्देश लोकांच्या संपर्कात राहणे हा असतो. मात्र नव्या पिढीने मोबाइलच्या वापराची संपूर्ण संकल्पनाच आता बदलून टाकली आहे. फोन वाजला की तो लगेच उचलण्यासाठी धावपळ आता कोणीही करत नाही. हातात फोन असला तरी तो वाजू द्यायचा आणि मग तो वाजायचा थांबल्यावर मेसेजद्वारे संपर्क करायचा. ही नवी पद्धत तरुणांनी सुरु केली आहे.
फोन न उचलण्याची कारणे -
१. तरुणांना आजकाल त्यातही नैराश्य येते. एखाद्या व्यक्तीचा फोन आल्यावर त्याच्याशी काय बोलावं? असा प्रश्न त्यांना पडतो. त्यातूनही ते पॅनिक होतात. पालकांचा फोन आल्यावर कुठे आहेस? घरी कधी येणार? कोणासोबत आहेस? असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नाची उत्तर देण्याची इच्छा नसते आणि दडपण या मुलांना येते.
२. मेसेज वर बोलताना विचार करण्यासाठी फार वेळ मिळतो. तसेच डिलिट करण्याचा एडीट करण्याचा पर्यायही असतो. त्यामुळे आपले विचार जास्त प्रभावीपणे मांडता येतात असे मुलांचे मत आहे. फोनवर बोलताना पटकन उत्तर द्यावे लागते. उत्तर सुचले नाही तर काही चुकीचे शब्द बोलले जाऊ शकतात याची भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे मेसेज करणे जास्त सोयीचे आणि प्रभावी वाटते.
३. तरुणांना फोनवर संवाद साधणे, चौकशी करणे, हालहवाल विचारणे म्हणजे आता वायफळ गप्पा वाटतात. तासंतास फोनवर असे बोलणे म्हणजे 'वेस्ट ऑफ टाइम' वाटते. या उलट मेसेजवर बोलताना इतरही कामं करता येतात. एकाच ठिकाणी लक्ष देऊन बोलावे लागत नाही. त्यामुळे वेळ वाचतो आणि संवादही होतो. शिवाय अनेकांशी एकाच वेळी बोलता येते.
अशा विविध बाबींमुळे तरुणपिढी फोनवर बोलण्यासाठी टाळाटाळ करते. जुन्या पिढीतील लोकांना या गोष्टीचा राग येतो, चिडचिड होते ते अगदी स्वाभाविक आहे. मात्र हे समजून घेणेही गरजेचे आहे की, त्यांचा हेतू दुर्लक्ष करणे हा नसून आता फोन न उचलणे अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. जसे पत्र पाठवणे कमी झाले, टेलिफोनचा जमाना गेला तसेच आता कॉलपेक्षा मेसेज जास्त सोयीस्कर वाटतात आणि पिढ्यांमध्ये सुसंवाद राहावा यासाठी नव्या संकल्पना जाणून घेणे गरजेचे आहे.