गिरिजा ओक हे नाव मराठी चित्रपटसृष्टीला काही नवं नाही. ती मागच्या कित्येक वर्षांपासून या क्षेत्रात आहे आणि कित्येक उत्कृष्ट भूमिका तिने केल्या आहेत. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीतही तिने काम केलेले आहे. पण अगदी काल- परवापर्यंत जी परिस्थिती होती ती अचानक बदलली आणि रातोरात गिरिजाबाबतचा होणारा इंटरनेटवरचा सर्च प्रचंड वाढला. लोक तिच्याबाबत जाणून घेण्यास खूप उत्सूक झाले.. तिचे सोशल मीडिया फॉलोअर्सही खूप वाढले. हे सगळं इतकं झपाट्याने होत आहे की आता रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी यांच्यानंतर गिरिजाकडे नॅशनल क्रश म्हणून पाहिलं जात आहे. या सगळ्या गोष्टीचा तिला प्रचंड आनंद तर आहेच, पण त्यासोबतच एका गोष्टीविषयीची प्रचंड नाराजी तिने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
गिरिजा म्हणते की सध्या सोशल मीडियावर जे काही सुरू आहे ते खरोखरच खूप भांबावून टाकणारं आहे. त्याचा आनंद तर आहेच कारण मी बऱ्याच जणांना माहिती होते आहे. त्यानिमित्ताने कित्येक नव्या लोकांना माझ्या कामाबद्दलची माहिती होते आहे. हे सगळं अतिशय छान आहे.
साखरपुडा स्पेशल : साखरेचा पुडा पॅक करण्यासाठी खास डेकोरेशन आयडिया, साखरपुडा पाहताच नवरी खुश..
पण त्याचबरोबर सोशल मीडियाची एक अत्यंत घाणेरडी बाजूही समोर येत आहे. जे ट्रेण्डिंग आहे ते उचलायचं आणि त्यासोबत छेडछाड करून मॉर्फिंग करून अश्लील गोष्टी तयार करून पोस्ट करायच्या अशा वाईट गोष्टीही यातून होत आहे. गिरिजाच्या बाबतीत तेच सगळं होत असून जेव्हा तिचा मुलगा मोठा होऊन हे सगळं बघेल तेव्हा क्षणभर तो त्याच्या आईबाबत काय विचार करेल, असा प्रश्नही तिने विचारला आहे..
महिलांच्या बाबतीत हा त्रास खूप वाढलेला आहे आणि सोशल मीडिया वापरणारी कोणतीही मुलगी किंवा महिला या प्रकारापासून सुरक्षित नाही. अकाऊंट हॅक करणं आणि त्यावरून इतरांना अश्लील भाषेत मेेसेज करणं, महिलांचे फोटो मॉर्फ करणं, त्यांचा कसाही वापर करणं हे सगळं आता खूप वाढलेलं आहे. जिच्या बाबतीत हे सगळं होतं, तिला या गोष्टींचा प्रचंड मानसिक त्रास होतो.
रातोरात चेहऱ्यावर येईल कोरियन ग्लास स्किन ग्लो! १ चमचा जवस घेऊन करा 'हा' उपाय
तिच्यासोबतच तिच्या सगळ्या कुटूंबालाच या त्रासातून जावं लागतं. मनाने कमकुवत असणाऱ्या किंवा कुटूंबाची साथ न मिळालेल्या मुली किंवा महिला तर या प्रकाराने हादरून जातात. त्यामुळेच तर गिरिजाने व्हिडिओ शेअर केला आहे आणि हे सगळं थांबवाा.. तुम्ही असे फोटो तयार करणाऱ्यांपैकी नसाल तर निदान अशा फोटोंना लाईक करणं, त्यावर कमेंट करणं तरी टाळा असं आवाहन ती करते आहे. या गोष्टी एका रात्रीतून बंद हाेणाऱ्या नाहीतच. पण निदान आपापल्या परीने त्याला कसा आळा घालता येईल हे प्रत्येकाने तपासलं आणि त्यानुसार पाऊल उचललं तर नक्कीच थोडाथोडका बदल तरी होऊ शकतो..
