“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे...” हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकत आलो, पण पुढच्या पिढ्यांना त्यातलं मर्म, त्यातला आनंद कळेल तरी का अशी आता भीती वाटते. माणूस तंत्रज्ञानाच्या वाटेने उंच भरारी घेतोय, पण मातीशी असलेली नाळ दिवसेंदिवस सैल होत आहे का? आपल्या आजी-आजोबांनी लावलेली आंबट-गोड फळांची झाडं, आपली फळबाग, पाखरं-किडे मुंग्या -शांतता पुढच्या पिढीला प्रत्यक्ष अनुभवता तरी येतील का? की ते फक्त कार्टूनमध्ये, पुस्तकात किंवा गुगलच्या फोटोमध्ये पाहातील हे सारे..
रस्ते, मेट्रो, विकास, बुलेट ट्रेन, सुसाट स्पीड, सुपरफास्ट मार्ग हवेत पण या विकासाच्या वाटेवर आपण काय गमावत आहोत, हा विचार करण्याचा मुद्दा आहे. आरे कॉलनीतील हिरवळ असो, विक्रोळीतील वृक्षराज असो किंवा आता नाशिकच्या तपोवनातील झाडं? विकासाच्या नावाखाली निसर्गावर होणारा आघात दिवसेंदिवस वाढत आहे. मानवाला खऱ्या अर्थाने या काँक्रिटच्या जंगलाची गरज आहे का? की आपल्याला खऱ्या अर्थाने ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची?
कुठल्याही पार्टीत मिळेल फुल अटेंशन, दिसाल क्लासी, पाहा ५ ड्रेस- व्हा पार्टी की शान
आज एका झाडाने पहिल्यांदा त्याचं मत मांडलं तर ते काय म्हणेल?
माणसा, आज तू माझ्या खोडावर लाल रंगाची फुली मारली. पण याचा अर्थ काय? माणसांच्या भाषेत 'खूण', पण माझ्या भाषेत 'मृत्यूपत्र'. मी एक झाड बोलतोय.. नाशिकच्या तपोवनातील, मुंबईच्या आरे कॉलनीतला किंवा विक्रोळीच्या खाडीतलं.. जागा बदलली, नावही बदलले पण व्यथा तीच आणि प्रश्नही तोच.. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत मी ठाम उभा राहिलो.
या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांना, पक्ष्यांनाच नाही तर मनुष्याला देखील राहण्यासाठी आसरा दिला. माझ्या सावलीत कित्येक थकलेल्या जीवांनी विसावा घेतला. पण या 'विकास' नावाच्या राक्षसाने मात्र माझा जीव घेतला..
माणसाला विकास नक्कीच हवाय, पण त्याआधी मुंबईच्या 'आरे'मध्ये माझ्या हजारो भावंडांची एका रात्रीत कत्तल केली. त्यांचा हुंदका त्या मेट्रोच्या आवाजात दाबला गेला.
मुंबईला पुरापासून वाचवणारी विक्रोळीची कांदळवने तोडली आणि आता नाशिकचे पवित्र तपोवन..
पण खरं सांगायचं झालं तर ज्याला तुम्ही मेट्रो सिटी म्हणता, मला ते स्मशानभूमी दिसते. जिथे कालपर्यंत पक्षांचा किलबिलाट होता, तिथे आज करवतींचा कर्कश आवाज येतोय. ज्या तपोवनाला प्रभू श्रीराम आणि सीता मातेचा स्पर्श लाभला आज कुंभमेळ्यासाठी तिथल्या झाडांच्या नशिबी कष्टाचा वनवास आला.
पण हे सारं निसर्गाच्या विरोधात नाही का?
पण ज्यावेळी तुम्ही झाडं तोडाल त्यावेळी मुक्या जनावराचं घरही तुटेल. त्याहीपेक्षा येणाऱ्या पिढीच्या वाट्याचा शेकडो लिटर ऑक्सिजन माझ्यासोबतच संपून जाईल. एक शेवटची विनंती... मला माहित आहे, माझा आवाज तुमच्या बुलडोझरच्या आवाजापुढे क्षीण होत जाईल. तुम्ही मला तोडणारच आहात. माझे तुकडे करून रस्ता मोकळा कराल. त्यावरून सुसाट वेगाने तुमची मेट्रो धावेल, तुमचे अनेक कार्यक्रम होतील, इतकंच नाही तर तुमची राजकीय पोळी देखील भाजून होईल.
पण, जाता जाता एकच सांगतो...
जेव्हा भविष्यात उन्हाच्या तडाख्याने श्वास घेण्यास अडचणी येतील तेव्हा सावलीसाठी मेट्रोच्या खांबाला मिठी मारु नका. जेव्हा शुद्ध हवेची गरज असेल तेव्हा मेट्रोच्या त्या थंडगार डब्यात ऑक्सिजन शोधू नका. आज मी रडतोय, कारण मला माझ्या मृत्यूची भीती नाहीये. मला भीती वाटतेय ती तुमच्या आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्याची. तुम्ही करवत चालवलं माझ्यावर तरी मी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला ऑक्सिजन देत जाईन. कारण 'देणे' हा माझा धर्म आहे आणि 'ओरबाडणे' हा मनुष्याचा... पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पैशांच्या नोटांनी श्वासांची जागा कधीच घेता येणार नाही.
माणसांने 'स्मार्ट सिटी' बनवण्याच्या नादात 'ग्रीन सिटी' गमावली.
आधी इथे 'झाडं' लावली जायची,जगवली जायची आणि 'माणसं' आनंदाने राहायची. आता इथे फक्त मोठमोठ्या गगनचुंबी इमारती बनवल्या जातात आणि माणसं फक्त 'श्वास' घेण्यासाठी धडपडताय. हा जो 'फरक' आहे ना, तोच एक दिवस तुमचा 'अंत' करणार आहे.
