Join us

अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:37 IST

काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा भेंडीची भाजी बनवली गेली, त्यामळे मुलगा रागावला आणि त्याच्या आईशी वाद घातल्यानंतर तो घर सोडून पळून गेला.

१७ वर्षांच्या मुलाला भेंडीची भाजी अजिबात आवडत नव्हती पण त्याची आई वारंवार घरात भेंडीची भाजी बनवून त्याला खायला द्यायची. यावरून तो त्याच्या आईशी अनेकदा भांडायचा. काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा भेंडीची भाजी बनवली गेली, त्यामळे मुलगा रागावला आणि त्याच्या आईशी वाद घातल्यानंतर तो घर सोडून पळून गेला. पोलिसांना तो दिल्लीपासून तब्बल १२०० किमी अंतरावर सापडला.

नागपूरमध्ये ही घटना घडली आहे. १७ वर्षांचा मुलगा कोणालाही न सांगता दिल्लीला पळून गेला. भेंडीची भाजी बनवण्यावरून त्याच्या आईशी भांडण झाल्यानंतर मुलगा रात्री ११ वाजता घरातून निघून ट्रेनमध्ये चढला आणि दिल्लीला पोहोचला. कुटुंबातील सदस्यांनी त्याचा नागपूरमध्ये  आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी शोध घेतला, परंतु तो सापडला नाही तेव्हा कुटुंबाने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस पथकाने त्याला दिल्लीहून शोधून काढले. विमानाने नागपूरला परत आणले आणि त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि सध्या तो कॉलेजमध्ये ए़डमिशन घेण्याची तयारी करत आहे. तो अभ्यासात चांगला होता पण स्वभावाने थोडा संवेदनशील होता. तो अनेकदा भेंडीमुळे रागावायचा आणि त्याच्या आईशी भांडायचा. १० जुलैच्या रात्री जेव्हा त्याची आई जेवणासाठी भेंडीची भाजी बनवते, तेव्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर मुलगा घरातून निघून गेला. त्याने कोणालाही सांगितलं नाही किंवा कोणाशीही संपर्क साधला नाही.

जेव्हा मुलगा रात्री घरी परतला नाही आणि त्याचा मोबाईल देखील बंद आढळला तेव्हा कुटुंबीय काळजीत पडले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मुलगा अल्पवयीन असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी मुलाच्या मोबाईल फोनचे लोकेशन, त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि फोन कॉल्स तपासले. 

या सर्वांच्या मदतीने तो ट्रेनने दिल्लीला गेला असल्याचं कळलं. त्यानंतर पोलीस पथकाने दिल्लीतील त्याच्या जुन्या मित्रांशी संपर्क साधला. चौकशीदरम्यान एका मित्राने सांगितलं की, तो त्याच्यासोबत राहत आहे. यानंतर पोलीस पथक दिल्लीला गेलं आणि त्याला सुरक्षितपणे घरी आणलं. मुलाला दिल्लीहून विमानाने नागपूरला आणण्यात आले आणि नंतर पोलीस ठाण्यात त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. मुलाला पाहून पालक भावूक झाले. 

टॅग्स :सोशल व्हायरल