काही अपवाद वगळता सार्वजनिक ठिकाणी वर्तनाबाबतचे काही किमान संकेत जगभरात पाळले जातात. प्रेमात असलेल्या जोडप्यांची जवळीक अनेक देशांच्या नजरांना फारशी खटकत नसली, तरी पूर्वेकडले देश मात्र अशा जवळीकीबाबत अजून बऱ्यापैकी सोवळे आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी दोन पाच मिनिटांची साधी मिठी मारण्यासाठी तरुणीच तरुणांना थेट पैसे देऊ लागल्या तर? -आणि तरुणही अशी मिठी मारून मिळेल, त्याकरता अमुक इतके पैसे पडतील, असे बोर्ड घेऊन उभे राहू लागले तर?(Meet the 'man mums' giving out free hugs in China).
- सध्या निदान चीनमध्ये असं होतं आहे खरं ! जगात सध्या नवनवीन ट्रेंड्स पॉप्युलर होत आहेत. दक्षिण कोरियात अलीकडेच नवरा किंवा बायको भाड्यानं घेण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात (Meet the 'man mums' giving out free hugs in China) प्रचलित झाला आहे. तसाच ‘जादू की झप्पी’चा हा चीनमधला नवीन ट्रेंड. ‘मॅन मम्स’ असं त्याचं नाव. खरं तर ‘मॅन मम्स’ हा शब्द जिममध्ये जाणाऱ्या, भरपूर व्यायाम करणाऱ्या आणि तगडी शरीरयष्टी असणाऱ्या युवकांसाठी (Man mums in China earn Rs 600 for a 5-minute hug; who are they and what’s behind this surprising new trend) वापरला जातो. सध्या हेच तरुण सार्वजनिक ठिकाणी तरुणींना मिठीत घेऊन मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहेत. अनेक तरुणीही राजीखुशीनं या तरुणांच्या बाहुपाशात शिरत आहेत, शिवाय त्यासाठी पैसेही मोजत आहेत. किंबहुना ही त्यांचीच मागणी आहे. तरुणांनी आपल्याला मिठीत घ्यावं, रोजच्या धबडग्यातून, चिंतेतून, त्रासातून एक शांत, उबदार अनुभव काही मिनिटांसाठी आपल्याला द्यावा, असं त्यांना वाटतंय.
तरुणींना का असं वाटतं आहे? त्याचीही अनेक कारणं आहेत. अनेक तरुणी वेगवेगळ्या त्रासांनी, कामाच्या, अभ्यासाच्या ओझ्यानं त्रस्त आहेत. त्यातून आपल्याला थोडा वेळ तरी शांतता लाभावी असं त्यांना वाटतं. त्यामुळे या तरुणीच बॉडीबिल्डर, दणकट तरुणांना दोन-पाच मिनिटांसाठी भाड्यानं बोलवत आहेत. या भाडोत्री तरुणांनी काय करायचं? - तर मेट्रो स्टेशन, बस स्टेशन, पार्क, शॉपिंग मॉल किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी भेटायचं आणि या तरुणींना पाच मिनिटांसाठी आलिंगन द्यायचं ! सार्वजनिक ठिकाणी यासाठी, की या भेटीतून कोणत्याही तरुणानं कुठलाही भलता अर्थ घेऊ नये आणि कोणताही अतिप्रसंग होऊ नये. या पाच मिनिटांच्या गळाभेटीचा दर आहे वीस ते पन्नास युआन ! (२५० ते ६०० रुपये.)
या तरुणी भाडोत्री तरुणांच्या केवळ बाहुपाशातच शिरत नाहीत, तर त्या आपल्या समस्याही त्यांना सांगतात. या समस्या त्यांनी सोडवाव्यात अशी त्यांची अपेक्षा नसते, तर त्या त्यांनी केवळ शांतपणे ऐकून घ्याव्यात, या तरुणींना कोणाकडे तरी आपलं मन मोकळं करता यावं, इमोशनल कम्फर्ट मिळावा, बस इतकंच !
यासाठी कोणत्या तरुणाला निवडायचं, याचा मात्र या तरुणी अतिशय बारकाईनं विचार करतात. त्याचा लुक, वागणूक, ॲटिट्यूड हे सारं तपासल्यानंतरच योग्य त्या तरुणाची निवड केली जाते. यामुळे या तरुणांना एक वेगळाच रोजगारही मिळाला आहे. अनेक तरुण रस्त्याच्या कडेला पोस्टर घेऊन उभे राहतात. त्यावर लिहिलेलं असतं, पाच मिनिटांच्या गळाभेटीसाठी ४०० रुपये, ५०० रुपये, ६०० रुपये !
यासंदर्भात एका विद्यार्थिनीनं सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती, पाच मिनिटांसाठी मी एका मित्राला मिठी मारली, त्यानंतर मला खूपच फ्रेश वाटलं आणि माझा ताण-तणाव मोठ्या प्रमाणावर निवळला. तिच्या या पोस्टला खूपच प्रतिसाद मिळाला आणि ही ‘हग थेरपी’ जोरात सुरू झाली ! मानवी स्पर्शातला दिलासा शोधत आपल्या एकाकीपणावर मात करू पाहणाऱ्या आधुनिक जगात सुरू झालेले हे असे प्रकार ही एका नव्या अस्वस्थ सामाजिक अवस्थेचीच चिन्हं आहेत, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.