lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > मश्रूम शेतीची कमाल, 22 वर्षांच्या काश्मिरी निलोफर जानने उभा केला मश्रूम बिझनेस!

मश्रूम शेतीची कमाल, 22 वर्षांच्या काश्मिरी निलोफर जानने उभा केला मश्रूम बिझनेस!

एक वेळ अशी होती 22 वर्षांच्या निलोफरच्या शिक्षणासाठी 16,000 रुपये फी भरणंही अशक्य होतं. पण आज तीच निलोफर महिन्याला मश्रूम लागवडीतून 50 हजार रुपये कमावते आहे. स्वत:च शिक्षण तर पूर्ण करतेच आहे शिवाय ती तिच्या कुटुंबाचाही आधार बनली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 06:06 PM2021-11-20T18:06:08+5:302021-11-20T20:16:07+5:30

एक वेळ अशी होती 22 वर्षांच्या निलोफरच्या शिक्षणासाठी 16,000 रुपये फी भरणंही अशक्य होतं. पण आज तीच निलोफर महिन्याला मश्रूम लागवडीतून 50 हजार रुपये कमावते आहे. स्वत:च शिक्षण तर पूर्ण करतेच आहे शिवाय ती तिच्या कुटुंबाचाही आधार बनली आहे.

Mashroom has fulfilled the dream of 22 year old Nilofar .. NilofarJaan from a small village in Pulwama earns Rs. 50,000 per month! | मश्रूम शेतीची कमाल, 22 वर्षांच्या काश्मिरी निलोफर जानने उभा केला मश्रूम बिझनेस!

मश्रूम शेतीची कमाल, 22 वर्षांच्या काश्मिरी निलोफर जानने उभा केला मश्रूम बिझनेस!

Highlights निलोफरच्या गावात स्थानिक कृषी विभागातर्फे एक सात दिवसांचं ‘मश्रूम लागवडी’चं प्रशिक्षण’ घेतलं गेलं. निलोफरनं ते प्रशिक्षण घेतलं. तीन महिन्यात निलोफर एक युनिट मश्रूम उगवते. ज्यातून तिला साधारणत: 500 किलो बटन मश्रुम मिळतात.आज एका बॅचनंतर दुसरी बॅच असं निलोफर बटन मश्रूमचं भरघोस उत्पादन घेत आहे.

 काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील गंगू नावाचं छोटसं गाव. एरवी या गावाची चर्चा होण्याचं काही कारण नव्हतं. पण 22 वर्षांच्या निलोफर जानमुळे हे गाव चर्चेत आलं. असं काय केलं निलोफरनं की तिची चर्चा देशभर होते आहे?

 त्याची एक गोष्ट आहे.

निलोफर जान नावाची तरुणी पुलवामा जिल्ह्यातील गंगू या छोट्याशा गावात गरीब कुटुंबात राहात होती. घरात चार सदस्य. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची. एक वेळ अशी होती की निलोफरच्या कुटुंबाला तिच्या एका सत्राची 16,000 रुपये फी भरणं अशक्य झालं होतं. निलोफरला परिस्थिती कळत होती. तिला शिकायचंही होतं आणि आपल्याकडे पैसे नाही याचीही स्पष्ट जाणीव होती. यासाठी ती तिच्या कुटुंबाला दोष देत बसली नाही. तिच्या मनात आपली आर्थिक परिस्थिती बदलण्याच्या इच्छेनं उचल खाल्ली. तिची इच्छाशक्ती दांडगी होती. एक संधी तिच्या गावात आली आणि तिने तिचा वेळ न दवडता उपयोग केला.

Image: Google

निलोफरच्या गावात स्थानिक कृषी विभागातर्फे एक सात दिवसांचं ‘मश्रूम लागवडी’ चं प्रशिक्षण’ घेतलं गेलं. निलोफरनं ते प्रशिक्षण तर घेतलंच पण आपणही घरात मश्रूम लागवड करायची हे तिने ठरवलं. कृषी विभाग मह्रुम लागवडीसाठी मश्रूम उगवण्याच्या बॅग्ज, कंपोस्ट माती आणि बी देण्यास तयार होती. पण त्यासाठी कृषी विभागाला 15,000 रुपये देणं आवश्यक होतं. घरात तर पैसे नव्हते. पण निलोफरनं पैसे जमवले आणि कृषी विभागाकडे भरले. कृषी विभागानं मश्रूम लागवडीसाठी आवश्यक ते सर्व सामान दिलं. निलोफरनं आपल्या छोट्याशा घरात बटन मश्रूम लागवडीस सुरुवात केली.

Image: Google

आज एका बॅचनंतर दुसरी बॅच असं निलोफर बटन मश्रूमचं भरघोस उत्पादन घेत आहे. तीन महिन्यात निलोफर एक युनिट मश्रूम उगवते. ज्यातून तिला साधारणत: 500 किलो बटन मश्रूम मिळतात. बटन मश्रूम बाजारात 140 ते 200 रुपये किलो दरानं विकले जातात. आज निलोफर महिन्याला 40-50 हजार बटन मश्रूमच्या लागवडीतून मिळवत आहे.
या मश्रूम लागवडीनं निलोफरला तिच्या पायावर तर उभं केलंच पण तिच्या घरातील आर्थिक संघर्ष देखील संपला. निलोफर आपल्या पैशातून घर तर चालवतेच शिवाय भांडवलासाठी पैसेही जमा करते आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय करता करता तिनं बाहेरुन का होईना शिक्षण पूृण करण्याचं ठरवलं आहे. ती सध्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठातून ( इग्नूतून) सोशल वर्कमधील आपली मास्टर डिग्री पूर्ण करत आहे.

 शिक्षणासाठी झटत असतानाच निलोफरला उपजिविकेचा मार्ग गवसला. ती स्वत: तर सक्षम झालीच पण आपल्या कुटुंबाचाही भक्कम आधार बनली आहे. निलोफर जानची ही यशस्वी संघर्षकथा प्रत्येक तरुणी आणि महिलेसाठी प्रेरणादायी आहे.

Image: Google

निलोफर सांगते मश्रुम  लागवडीचं तंत्र

1.मश्रूम उत्पादनासाठी ग्रो बॅग मिळते. ती कंपोस्ट माती ( खतयुक्त माती) आणि मश्रूमच्या बियांनी भरायची असते. बिर्याणी करताना जसे आपण थरावर थर देतो तसे आधी कंपोस्ट मातीचा थर मग मश्रुम बियाणांचा थर मग पुन्हा माती पुन्हा बियाणं असं करुन ही ग्रो बॅग भरायची.
2.  ही ग्रो बॅग जिथे सूर्यप्रकाश येणार नाही अशा खोलीत ठेवावी. मश्रूमला सूर्यप्रकाश लागत नाही.
3.  ग्रो बॅग ठेवलेल्या खोलीचं तापमान 30 अंश सेल्सिअस असं मेंटेन ठेवावं लागतं. थंड वातावरणात यासाठी निलोफरनं इलेक्ट्रिक हिटर आणि इतर उबदार साधनांचा उपयोग केला.
4.  निलोफर म्हणते कंपोस्ट मातीचा वरचा थर पाहून पाणी किती टाकायचं याचा अंदाज येतो. कंपोस्ट माती सुकली की समजायचं पाणी हवं आहे. दिवसातून दोन वेळा तरी पाणी द्यावं लागतं.
5.  मश्रूम लागवडीदरम्यान त्या खोलीत किटक , माशी जाणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागते. थोडंसं दुर्लक्षही या नाजूक पिकाचं नुकसान करु शकतं. दुर्लक्षामुळे मश्रूमला किड लागू शकते.

Web Title: Mashroom has fulfilled the dream of 22 year old Nilofar .. NilofarJaan from a small village in Pulwama earns Rs. 50,000 per month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.