Join us

''इश्‍क में उम्र नहीं देखी जाती”, १९ वर्षीय तरुणीचा जडला ७० वर्षीय व्यक्तीवर जीव, व्हायरल लव्ह स्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2022 15:04 IST

Viral Love Story Age Gap माॅर्निंग वाॅकला गेलेल्या जोडप्याची स्टोरी आहे हटके, १९ वर्षीय तरूणीने ७० वर्षीय वयस्कर व्यक्तीशी संसारच थाटला

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं…युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं, हे आपण अनेक प्रेम कथांमधून ऐकत आलो आहे. प्रेम आधळं असतं, प्रेमात वय, धर्म, रंग, पैसा, प्रतिष्ठा बघितली जात नाही. असच एक प्रेमात अखंड बुडालेलं जोडपं सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे. कारणच तसं आहे, एका १९ वर्षीय तरुणीचा जीव चक्क ७० वर्षीय वयस्कर व्यक्तीवर जडला आहे. ऐकून शॉक बसला ना ? हो, हे खरं घडलं आहे, पाकिस्तान येथील लाहोरमध्ये. तर, हि लव्ह स्टोरी सुरु झाली सकाळच्या माॅर्निंग वाॅकपासून. तर झालं असं, मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या एका 19 वर्षीय मुलीची 70 वर्षाच्या व्यक्तीशी टक्कर झाली. दोघांमध्ये काही बोलणं झालं, नंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या दोघांची फिल्मी आणि हटके लव्ह स्टोरी आता व्हायरल होत आहे.

७० वर्षीय लियाकत आणि  १९ वर्षीय शमाइला हे दोघेही लाहोरमध्ये राहतात. लियाकत अली आपल्या लव्ह स्टोरीबद्दल अगदी खुलेपणाने बोलतात. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल लियाकत म्हणाले, 'एकदा शमाइला रस्त्यावरून  जात असताना मी मागून गाणे गुणगुणायला सुरुवात केली. तिने माझ्याकडे वळून पाहिले. मग काय, आम्ही प्रेमात पडलो.’’ जेव्हा शमाइलाला वयाच्या अंतराबद्दल विचारलं गेलं तेव्हा ती म्हणली, ‘’बघा... प्रेमात वय पाहिलं जात नाही, प्रेम बस होऊन जातं. वय काय, जात काय, प्रेमात फक्त प्रेम पाहिलं जात’’. घरच्यांबद्दल ती पुढे म्हणाली, ‘’सुरुवातीला आमच्या कुटुंबीयांनी या नात्यावर आक्षेप घेतला होता. पण आम्ही त्यांची समजूत काढली. नंतर नातेवाईक म्हणाले की, तुमची हीच इच्छा असेल, तर आम्ही काय करू शकतो. याच वर्षाच्या सुरुवातीला आम्ही लग्नगाठ बांधली.’’थोडक्यात काय, मियाँ बीवी राज़ी तो क्या करेगा क़ाज़ी.

वयात अंतर असलेल्या जोडप्याने लग्न करावे का? असं लियाकत यांना विचारले असता ते म्हणाले, ‘’केलं पाहिजे, हृदय तरुण असलं तर, वय काय फक्त आकडा आहे’’. पुढे शमाइला म्हणाली, ‘’प्रत्येकाला त्यांच्या आवडीनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, आणि मी लियाकतसोबत खूप खूश आहे, प्रेमाला आणि लग्नाला वयाची मर्यादा नसते’’. पुढे लियाकत म्हणाले, ‘’रोमँटिक होण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रत्येक वयाची एक वेगळीच मजा असते.’’

वयातील अंतरामुळे चर्चेत आलेल्या या पाकिस्तानी जोडप्याच्या लव्ह स्टोरीवर सोशल मीडिया युजर्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. त्यांची लव्ह स्टोरी यूट्यूबवर तुफान व्हायरल होत आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियापाकिस्तानदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट