Miss Universe 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी मनिका विश्वकर्मा स्टेजवर आली तेव्हा तिचा सुवर्ण राष्ट्रीय पोशाख पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले. हा पोशाख फक्त सुंदर नव्हता, तर भारताच्या बौद्ध परंपरेचा आणि बुद्धांच्या शिकवणीचा एक सुंदर नमुना होता.
या पोशाखाचे नाव आहे “The Birth of Enlightenment” म्हणजेच प्रबोधनाचा जन्म. हा पोशाख बुद्धांना बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले त्या क्षणाची आठवण करुन देणारा आहे. त्यात वापरलेले सोन्याचा आणि केशरी रंग खूप अर्थपूर्ण आहेत. सोन्याचा रंग दिव्यतेचा आणि तेजाचा, तर केशरी रंग शांततेचा आणि बौद्ध भिक्षूंच्या वस्त्रांचे प्रतीक आहे. त्यामुळे संपूर्ण पोशाखात एक वेगळीच चमक आणि आध्यात्मिक भावना दिसते. या पोशाखाची रचनाही खास आहे. भारतातील सांची, बोधगया यांसारख्या प्राचीन बौद्ध ठिकाणांच्या मंदिरांपासून आणि स्तूपांपासून प्रेरणा घेऊन हे डिझाइन तयार केले आहे. मनिकाच्या मागे असलेले केशरी रंगाचे कापड संयमाचे प्रतिक आहे.
तिने परिधान केलेला मुकुटही अत्यंत सुंदर होता. कळसासारखा आकार, सोन्याचे नाजूक काम आणि वरती कमळाचे चिन्ह हे सगळे मिळून मुकुटाला एक पवित्र आणि आकर्षक रूप देतात. कमळ हे शुद्धतेचे आणि शांततेचे प्रतीक असल्याने हा संपूर्ण लुक आणखी खास वाटतो. मंचावर चालताना मनिकाने केलेली अंजली मुद्रा (दोन्ही हात जोडून नमस्कार) तिच्या संपूर्ण प्रस्तुतीला एक शांत आणि आदराचा स्पर्श देत होती. ती मुद्रा पाहून असे वाटत होते की भारताच्या परंपरेला ती खूप आदराने मांडत आहे.
मनिकाने सांगितले आहे की हा पोशाख भारताच्या बौद्ध इतिहासाचा, बोधगयातील प्रबोधनाच्या क्षणाचा आणि ज्ञानाच्या प्रकाशाला आदर देणारा आहे. तिच्या पोशाखातील प्रत्येक रंग, प्रत्येक रेषा आणि प्रत्येक सजावट भारताच्या आध्यात्मिक वारस्याची आठवण करून देते.
