Lokmat Sakhi >Social Viral > Monsoon: प्रेमात पाडणारा पाऊस! आपल्या अवतीभोवती पाहा जो तो नव्यानं सुरु करतोय आयुष्य!

Monsoon: प्रेमात पाडणारा पाऊस! आपल्या अवतीभोवती पाहा जो तो नव्यानं सुरु करतोय आयुष्य!

आला आषाढ : पावसात सारं जग कसं नव्यानं बहरतं-उमलतं त्याची रोमॅन्टिक गोष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2025 10:10 IST2025-07-01T10:02:54+5:302025-07-01T10:10:01+5:30

आला आषाढ : पावसात सारं जग कसं नव्यानं बहरतं-उमलतं त्याची रोमॅन्टिक गोष्ट !

Indian Monsoon and romance, how nature changes in Monsoon, a love story | Monsoon: प्रेमात पाडणारा पाऊस! आपल्या अवतीभोवती पाहा जो तो नव्यानं सुरु करतोय आयुष्य!

Monsoon: प्रेमात पाडणारा पाऊस! आपल्या अवतीभोवती पाहा जो तो नव्यानं सुरु करतोय आयुष्य!

Highlightsत्याचं येणंच साऱ्या जीवसृष्टीला प्रेमात पाडतं. आणि पावसासह प्रत्येकाची प्रेमात पडण्याची, उमलण्याची, वाढण्याची, बहरण्याची तऱ्हाही वेगळी असते.

अंजना देवस्थळे (लेखिका हाॅर्टिकल्चरिस्ट आहेत.)


पावसाचे दिवस आले की मी आमच्या गावी आमच्या जंगलात निघून जाते. कारण पावसाने घडवलेले सर्व चमत्कार तिथेच बघता येतात.
आषाढ जवळ आला तशी पावसाची सारी रुपं आठवतात. पाऊस येतो आणि बघता बघता भवतालचं जग बदलू लागतं.
पहिला पाऊस. सर्वत्र पसरलेला मृदगंध. आणि त्यानंतर घराजवळच्या जंगलात घडणाऱ्या सर्व नाट्यमय अद्भुत घडामोडी.
सारं याची देही, याची डोळा तिथे अनुभवता येतं..
पावसाची पहिली मोठी सर पडली की बघता बघता निसर्गातलं ही नेपथ्य बदलू लागतं. कोरड्या रखरखीत जमिनीत सुप्त अवस्थेत दडून बसलेल्या बिया, कंद लगेच जागे होतात. बियांना अंकुर फुटतात, कंदांना कोंब येतात. सृष्टीचा असा अचानक कायापालट याच घाईगडबडीत असणाऱ्या झाडांमुळे होतं.
शेवळ्याच्या फुलांचे कोंब बाणासारखे बाहेर येतात. कुठे नेचे, कुठे कवक तर कुठे कुत्र्याच्या छत्र्या प्रकट होतात.
घाई म्हणजे किती?
पाऊस पडल्यानंतर अवघ्या ४८ तासांत क्रिनम लिलीची देखणी फुलं रंगमंचावर प्रवेश करतात. पांढरी टपोरी पण नाजूक फुलं.


त्यांची एवढी घाई, की पानांना मागे सोडून फुलंच आधी येतात. जशी येण्याची घाई तशीच जाण्याचीही, काही दिवसांनी जर तुम्ही जंगलात गेलात तर ती फुलं चुरगळलेली फुलं दिसतील. त्याहून उशिरा गेलात तर फुलं गायब, मोठी तुकतुकीत हिरवीगार देखणी पानं बघूनच समाधान मानावे लागेल.
लांब पानांच्या ‘पान कुसुमची’ ही अशीच घाई.
दोन-चार फुलांच्या गुच्छात येणारी देखणी फुलं.
चटकन समजा दिसली नाही तर त्यांचा मंद सुवास लक्ष वेधून घेतो. तारकांसारखी पिवळी मुसळीची फुलं जरी बारीक असली तरी अत्यंत देखणी.
फुलं उमलली की त्यांचे सहकलाकार भुंगे, माशा, फुलपाखर, पतंग, नाकतोडे, मधमाशा, इतर कीटक आणि पक्षी देखील लगेच अवतरतात .
सगळीकडे हिरवेगार. भरपूर कोवळी पानं. खायला मुबलक अन्न असल्यामुळे कीटकांना सुगीचा काळ असतो. पिलांना वाढवण्यासाठी उत्तम वेळ.
सगळ्यांना कसं प्रेमाचं भरतं येतं, जंगल कसं प्रफुल्लित होतं !
पाऊस पडण्याची वाट बघत पाल्यापाचोळ्यात निद्र अवस्थेत दडून बसलेले कीटक हळूच बाहेर निघतात.
मृगाचा कीडा म्हणून ओळखला जाणारा लालबुंद, मखमली कीडा याच काळात दिसतो.
पावसात असं घाईघाई सारं नवं नवं होऊन जातं.
सारं जगच ओलंचिंब होत नव्यानं जगण्याची, बहरण्याची स्वप्न सजवू लागतं.

 

प्रेमालाही येतो पूर !

पावसाळा हा प्रेमाचा, प्रियाराधनाचा आणि प्रजननाचा काळ. त्यामुळे सगळे नर कसे आपल्या आवडत्या ‘तिला’ पाटवायच्या कामाला लागतात.
पिसारा फुलवून लांडोरीला आकर्षित करण्याचा मोराचा प्रयत्न सर्वज्ञात आहे. असाच प्रकार अगदी बारीक सारीक जीवही करत असतात.
रात्रंदिवस पक्षी, कीटक एकमेकांना साद घालत असतात. प्रेमागीत, युगालगीतांनी वातावरण भरून जातं. बेडकांचे सुर लागतात.
प्रत्येक प्रकारच्या बेडकांचे वेगळे डराव डराव स्वर वेगळे, पट्टी वेगळी आणि सुरही.
जंगलात रातकिड्यांचे ही प्रकार असतात, त्यात दिवसा सिकाडा आणि रात्री क्रिकेट्सचा आवाज, एका तालात, एका सुरात न थांबता, श्वास न घेता, ब्रेथलेस असावं असा ! सततची किरकिर. काही कीटक गाणं गात नाहीत ते चमकून स्वयंप्रकाशित होऊन आकर्षणाचा खेळ खेळतात. त्यांना आपण काजवे म्हणतो. रात्रीच्या काळोखात टीमटीमत्या ताऱ्यांचा अद्भुत नयनरम्य दृश्य. प्रणयासाठी किती ते चमकणं !
फुलपाखरांना मात्र आवाजही नाही आणि चमकणंही नाही, ते रंगांनी आकर्षित करतात. नर फुलपाखरांचा मिलनापूर्वीचा मादी फुलपाखराचा लयबद्ध पाठलाग नृत्यासारखाच असतो. त्यामुळे त्याला ‘कोर्टशिप डान्स’ म्हणतात.
काही कीटक कामगंध पसरवून मादीला प्रेमाचा संदेश पाठवतात. खूप खूप लांबून ही कीटकांना हा गंध ओळखता येतो आणि आमंत्रित करतो.


पावसाळ्यात चतुर बघतले आहेत का कधी? हवेत उडता उडता अशा गिरक्या, हरकती घेतात आणि असेच उडत उडत मिलनही करतात.
पक्ष्यांची पिलं एव्हाना घरट्यात वाढत असतात. त्यांच्या पालकांची पिलांना भरवण्याची लगबग सुरु असते.
अळ्या, सुरवंट मुबलक प्रमाणात सापडत असल्याने त्यांची आनंदी शीळ बऱ्याचदा कानावर पडते.
पाऊसचा संबंध सर्वात जास्त कोकीळेशी जोडला गेला आहे. काव्यात, गाण्यांमध्ये कोकिळेच्या गाण्याची तुलना, प्रियकराची आतुरतेने वाट
बघणाऱ्या, व्याकूळ झालेल्या नायिकेशी केली जाते.
पण कोकीळ आणि कोकिळा ही एकाच एक प्रकारचे नसतात बरं का !
आपल्याकडे कोकीळचे तीन प्रकार आहेत.
एक तर चातक, दूर आफ्रिकेतून स्थलांतर करून पावसाची वर्दी देणारा. कू कू क असे स्वर काढत चातकासारखा पावसाची वाट बघत बसणारा.
प्यायलो तर स्वाती नक्षत्राचंच पाणी पिणार नाही तर राहीन तहानलेला असा हा कोकीळ.
आणि तिसरा म्हणजे पावश्या. हा तर त्याच्या वरच्या टिपेत, ‘पेरते व्हा’, ‘पेरते व्हा’ असा संदेश देणारा..
(एकेकाळी गोऱ्या साहेबाच्या डोक्यात गेला होता याचा आवाज आणि त्याने या पक्षाच्या आवाजाला ब्रेन फिवर असं नाव दिलं.)


आणि खोटं नाही ते, त्याचं गाणं सुरु झालं की चालतं असंच वरच्या टिपेत !
आम्हाला देखील असंच होतं कधी तरी, कोकीळचं गाणं कितीही मंजूळ वाटत असलं तरी अनेकदा भल्या पहाटेच काय मध्यरात्री देखील त्यांचं गायन सुरु होतं.
कधीकधी झोपमोड झाली की कर्कश वाटतं.
वास्तविक हे कुहू कुहू गाणारा कोकीळ असतो. त्यांचं हे गाणं कधी प्रेमाचं असतं तर कधी इतर पक्ष्यांना फसविण्यासाठी देखील असतं.
कोकीळ कुळातले पक्षी घरटी बांधत नाहीत. ते इतर पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतात. मग त्यांना फसवायला, त्यांचं लक्ष्य विचलित करायला, मोठमोठ्यानं असं गातात, शीळ घालतात.
आणि हे सारं घडत असतं तेव्हा पाऊस पडतो असतो.
पाऊस आला की सारं बदलतं, कायमच.
पाऊस. त्याचं येणंच साऱ्या जीवसृष्टीला प्रेमात पाडतं.
आणि पावसासह प्रत्येकाची प्रेमात पडण्याची, उमलण्याची, वाढण्याची, बहरण्याची तऱ्हाही वेगळी असते.

अंजना देवस्थळे
(लेखिका हाॅर्टिकल्चरिस्ट आहेत.)
anjanahorticulture@gmail.com

 

Web Title: Indian Monsoon and romance, how nature changes in Monsoon, a love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.