लंडनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय तरुणीने आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमधून काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तरुणा विनायकीया असं या तरुणीचं नाव असून तिने ऑफिसमधून काम करण्याबद्दल पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने स्पष्टपणे आठवड्यातून चार, पाच दिवस ऑफिसला जाणार नाही असं सांगितलं. तसेच लंडनच्या महागड्या जीवनशैलीत जगणं आधीच कठीण आहे, म्हणून ती तिचा पगार प्रवासावर वाया घालवू शकत नाही असंही म्हटलं आहे.
LEGO कंपनीत ग्लोबल इन्फ्लुएंसर स्ट्रॅटेजी मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने लिंक्डइनवर आपली नाराजी व्यक्त केली. चांगली नोकरी असूनही तिला दरमहा बिल भरण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे आणि घर खरेदी करणं तर स्वप्नच राहिल्याचं सांगितलं. तिची या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून ती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
“मी २५ वर्षांची आहे, माझं तथाकथित 'चांगलं' करियर आहे, लंडनमध्ये राहते आणि अजूनही दरमहा माझी बिलं भरण्यासाठी संघर्ष करत आहे. कदाचित मी कधीही घर घेऊ शकणार नाही. जेव्हा सर्व उच्च पदांवर असे लोक असतात जे निवृत्त होईपर्यंत कधीच हलणार नाहीत, तेव्हा करिअरची प्रगती हे एक दूरचं स्वप्न असतं."
“कॉर्पोरेट शिडी चढणं? निवृत्त होईपर्यंत हलणार नाहीत असे लोक असतात तेव्हा हे स्वप्न नसतं. आणि कशासाठी? राहणीमानाच्या खर्चाशी जुळवून न घेता येणाऱ्या थोड्या चांगल्या पगारासाठी कठोर परिश्रम करायचे?"असा सवालही भारतीय तरुणी तरुणा विनायकीया हिने विचारला आहे. तिच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.