Join us

अरे बापरे! उन्हाळ्यात होऊ शकतो एसीचा स्फोट; तुम्हीही करता का 'या' जीवघेण्या चुका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:56 IST

उन्हाळा येताच एसीचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याच्या अनेक घटना दरवर्षी समोर येतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात एसी असेल तर काही विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे.

नोएडामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. सेक्टर १८ मधील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, लोकांना जीव वाचवण्यासाठी काचा फोडून चौथ्या मजल्यावरून उड्या माराव्या लागल्या असं सांगण्यात येत आहे. या घटनेशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एसीमधील स्फोट हे आगीमागील कारण असल्याचं म्हटलं जात आहे. उन्हाळा येताच एसीचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याच्या अनेक घटना दरवर्षी समोर येतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात एसी असेल तर काही विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे. एसीचा स्फोट का होतो आणि तो टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेणं आवश्यक आहे ते जाणून घेऊया....

'या' चुकांमुळे होऊ शकतो एसीचा स्फोट

मेंटेनेन्सचा अभाव

एसीमध्ये धूळ आणि घाण जमा होते, ज्यामुळे कूलिंग कॉइल आणि कंप्रेसरवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत एसी लवकर गरम होतो आणि स्फोट होण्याची शक्यता वाढते. हा धोका टाळण्यासाठी, एसीच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. दर १५ दिवसांनी एअर फिल्टर स्वच्छ करत राहा आणि उन्हाळ्यात एसी सुरू करण्याआधी एकदा त्याची सर्व्हिसिंग देखील करून घ्या.

एसी तासन्तास सुरू ठेवणं

उष्णता वाढत असल्याने एसीची गरज वाढते. बरेच लोक एसी तासन्तास चालू ठेवतात, ज्यामुळे कंप्रेसरवर अतिरिक्त दाब येतो. यामुळे एसीचा स्फोट होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, जास्त वेळ एसी सुरू ठेवणं टाळा. यासाठी तुम्ही एसीमध्ये टायमर सेट करू शकता. असं केल्याने एसी कूलिंग झाल्यानंतर आपोआप बंद होतो. यामुळे स्फोटाचा धोका कमी होतो आणि तुमचे वीज बिल देखील कमी येतं.

स्टॅबिलायझर नसणं

बरेच लोक थोडे पैसे वाचवण्याच्या नादात एसी बसवताना स्टॅबिलायझर बसवत नाहीत, ज्यामुळे स्फोट होण्याचा धोका देखील वाढतो. उन्हाळ्यात व्होल्टेजची समस्या सामान्य असते. अशा परिस्थितीत वीज चढउतारांमुळे एसी कंप्रेसरवर दाब येतो. तसेच स्टॅबिलायझर न बसवल्याने एसीमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे स्फोट देखील होऊ शकतो.

बाहेरचं युनिट साफ न करणं

बरेच लोक एसी सर्व्हिसिंग करताना फक्त एअर फिल्टर स्वच्छ करतात आणि बाहेरील युनिटच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. असं केल्याने एसीमध्ये आग लागण्याची शक्यताही वाढते. कंडेन्सर कॉइल्सचा मार्गात धूळ साचल्याने अडथळे निर्माण होतात. यामुळे एसी नीट काम करत नाही आणि लवकर गरम होऊ लागतो. 

गॅस लीकेज

जर एसीमध्ये रेफ्रिजरंट गॅस लीक होत असेल आणि जवळपास इलेक्ट्रिक सोर्स असेल तर स्फोट होऊ शकतो. गॅस लीकेजकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. अशा परिस्थितीत एसीचं सर्व्हिसिंग करताना, गॅस लीकेज देखील तपासा. जर तुम्हाला गॅस लीकेजचा वास येत असेल तर ताबडतोब एसी बंद करा आणि टेक्निशीयनला बोलवा. या काही गोष्टी लक्षात ठेवून, तुम्ही एसीचा स्फोट होण्याचा धोका टाळू शकताच, परंतु या पद्धती एसी कूलिंगमध्ये सुधारणा करतात आणि तुमचे वीज बिल कमी करतात.