हिवाळा सुरू झाला की बाजारात संत्री पाहायला मिळतात. आंबट-गोड आणि रसाळ संत्री फक्त चवीलाच उत्तम नसतात, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानली जातात. व्हिटॅमिन-सी ने भरपूर असलेले हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, त्वचा चमकदार करण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी मदत करतं.
अनेकदा संत्री खरेदी करताना एक प्रश्न मनात येतो—कोणतं संत्र गोड आहे आणि कोणतं आंबट? अनेकदा बाहेरून चांगली दिसणारी संत्री घरी आणून सोलल्यानंतर आंबट निघतात. काही सोप्या आणि घरगुती ट्रिक्स वापरून तुम्ही संत्री हातात घेताच ती गोड आहेत की नाही, याचा अंदाज लावू शकता. यासाठी कोणत्याही मशीनची किंवा संत्र सोलण्याची गरज नाही.
वजनावरून ओळखा
गोड संत्री ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचं वजन पाहणं. एकाच आकाराची दोन संत्री हातात घ्या. जे संत्र वजनाला जास्त जड वाटेल, ते साधारणपणे जास्त रसाळ आणि गोड असतं. हलकी संत्री अनेकदा सुकलेली किंवा जास्त आंबट असू शकतात.
संत्र्याचं साल
गोड संत्र्याची साल सहसा पातळ आणि थोडी मऊ असते. जर साल खूप जाड, कडक किंवा कोरडी वाटत असेल, तर ते संत्र आंबट असू शकतं. जास्त खडबडीत किंवा वर आलेली साल असलेली संत्री टाळलेलीच बरी.
रंग
खूप जास्त चमकणारी किंवा हिरवी संत्री गोड असतीलच असं नाही. चांगल्या, पिकलेल्या आणि गोड संत्र्याचा रंग साधारणपणे फिकट नारिंगी किंवा पिवळसर-नारिंगी असतो. ज्या संत्र्यावर जास्त हिरवे डाग असतात, ती अनेकदा कच्ची आणि आंबट निघतात.
हलकं दाबून पाहा
संत्र्याला हलक्या हाताने दाबून पाहा. जर ते थोडं दबले गेले आणि पुन्हा आपल्या आकारात आले, तर ते ताजे आणि रसाळ असतं. खूप जास्त कडक किंवा अतिशय मऊ संत्री चवीला खराब असू शकतात.
सुगंधावरून कळेल
गोड संत्र्याला एक प्रकारचा ताजा आणि गोडसर सुगंध येतो. जर संत्र्याला कोणताही वास नसेल किंवा विचित्र वास येत असेल, तर ते खरेदी करणं टाळा.
देठाचा भाग
संत्र्याच्या वरचा देठाचा भाग जर थोडा आतल्या बाजूला दबलेला आणि स्वच्छ दिसत असेल, तर ते संत्रे नीट पिकलेलं आणि गोड असण्याची शक्यता जास्त असते.
योग्य संत्री निवडणं का महत्त्वाचं?
चुकीची संत्री निवडल्यामुळे केवळ चवच बिघडत नाही, तर अनेकदा लोक फळ खाणंच सोडून देतात. योग्य संत्री निवडल्यामुळे तुम्हाला भरपूर पोषण, उत्तम चव मिळते. आता संत्री खरेदी करताना तुम्हाला गोंधळण्याची गरज नाही. पुढच्या वेळी बाजारात जाल तेव्हा फक्त वजन, साल, रंग आणि सुगंध तपासून पाहा. संत्री न सोलताच तुम्हाला ती गोड आहेत की नाही, याचा अचूक अंदाज येईल.
