पोळपाट आणि लाटणं या दोन आपल्या स्वयंपाक घरातल्या अतिशय महत्त्वाच्या वस्तू. त्यांच्याशिवाय खरंतर आपला दिवस जातच नाही असं म्हटलं तरी चालेल.. क्वचितच कधीतरी त्यांना आराम असतो. नाहीतर एरवी अगदी रोजच्या रोज त्यांच्या मदतीने पोळ्या, पराठे, फुलके होतच असतात. आता रोजचं काम झाल्यानंतर आपण ते स्वच्छ करतो. पण बऱ्याचदा तेवढीच स्वच्छता पुरेशी ठरत नाही. ती खूप वरवरची होते. त्यामुळे मग काही दिवसांतच त्यांच्यावर काळपट, हिरवा थर दिसायला लागताे. पोळपाटाच्या कडा तर बऱ्याचदा चिकट होतात. पोळपाट लाटण्यावर जमा झालेलं हे फंगस काढून टाकणं खूप गरजेचं आहे. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणूनच त्यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, ते पाहूया..(How to Clean Wooden Belan, Polpat Or Rolling Pan?)
लाकडी पोळपाट- लाटणे कसे स्वच्छ करावे?
पोळपाट लाटण्यावर जमा झालेला काळपट थर काढून टाकण्यासाठी सगळ्यात आधी तर एका मोठ्या भांड्यामध्ये थोडे गरम पाणी करा. पोळपाट आणि लाटणे त्या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून ठेवता येईल असे मोठेच भांडे घ्या.
आता त्या गरम पाण्यामध्ये १ ते २ चमचे बेकिंग सोडा घाला. यामध्ये १५ ते २० मिनिटे पोळपाट, लाटणे बुडवून ठेवा.
यानंतर पोळपाट, लाटणे पाण्यातून बाहेर काढा. त्यावर सगळीकडून मीठ आणि तांदळाचं थोडं जाडसर पीठ लावा आणि लिंबाची सालं वापरून ते व्यवस्थित घासून काढा.
नंतर ते स्वच्छ धुवून घ्या. यानंतरही पोळपाट लाटण्यावरचा काळसरपणा कमी झालेला नसेल तर पुन्हा एकदा मीठ, तांदाळाचं पीठ लावून ते घासून काढा.
लाटणं आणि पोळपाट धुतल्यानंतर ते पक्के वाळण्यासाठी काही वेळ कडक उन्हामध्ये ठेवून द्या. या पद्धतीने आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करायलाच हवे.