दिवाळीपूर्वी साफसफाई करुन घरातील कानाकोपरा अगदी स्वच्छ व चकचकीत केला जातो. हॉल, बेडरुम, देवघर सगळं धुवून - पुसून स्वच्छ केलं तरी किचन स्वच्छ करणं म्हणजे सर्वात कठीण, किचकट आणि वेळखाऊ काम. साफसफाई करताना अनेकदा आपण गॅस स्टोव्ह, टाईल्स, भांडी, रॅक याकडे लक्ष देतो, पण एक गोष्ट मात्र नेहमीच दुर्लक्षित रहाते, ते म्हणजे प्लास्टिकचे डबे आणि कंटेनर... रोजच्या वापरातील प्लास्टिकचे कंटेनर आणि डबे अनेकदा खूपच खराब होतात. या डब्यांवर हट्टी पिवळे डाग पडतात, चिकटपणा आणि मसाल्यांचा किंवा तेलकट पदार्थांचा वास येतो. अशावेळी हे प्लास्टिकचे कंटेनर व डबे कितीही धुतलं तरी त्याचा दुर्गंध आणि चिकटपणा जात नाही. ज्यामुळे हे प्लास्टिकचे डबे व कंटेनर फेकून देण्याची वेळ येते. सोबतच, या डब्यांवरील डाग आणि चिकटपणा आरोग्यासाठीही धोकादायक असतो(plastic container cleaning).
यंदाच्या दिवाळीत किचनला एक नवीन आणि फ्रेश लूक देण्यासाठी, हे जुने, पिवळे झालेले आणि चिकट डबे अगदी कमी खर्चात आणि कमी मेहनतीत पुन्हा नव्यासारखे स्वच्छ करण्याची खास ट्रिक... स्वयंपाकघरातील काही खास पदार्थांचा वापर करुन आपण हे प्लास्टिकचे डबे आणि कंटेनर नव्यासारखे स्वच्छ करु शकतो. किचनमधील प्लास्टिकचे कंटेनर, डबे अगदी नव्यासारखे चमकदार करण्यासाठीच्या ३ सोप्या ट्रिक्स पाहूयात...
किचनमधील प्लास्टिकचे कंटेनर, डबे कसे स्वच्छ करायचे ?
१. व्हिनेगर आणि गरम पाणी :- यासाठी सर्वात आधी एका टबमध्ये गरम पाणी घ्या. आता त्यामध्ये साधारण २ ते ३ चमचे व्हिनेगर घाला आणि मिसळा. या द्रावणामध्ये प्लास्टिकच्या डब्यांना १५ ते २० मिनिटांसाठी भिजत ठेवा. पाणी इतकेच गरम असले पाहिजे की, ज्यामध्ये तुम्ही हात सहज टाकू शकता. जर डबे प्लास्टिकचे असतील, तर जास्त उष्ण पाणी घेऊ नका, कारण ते उष्णतेमुळे वितळू शकतात. २० मिनिटांनंतर, वॉशिंग ब्रशने घासून ते साफ करू शकता. गरम पाण्यामुळे चिकटपणा आणि चिकट थर मोकळा होतो, ज्यामुळे प्लास्टिकच्या डब्यांची सफाई करणे सोपे जाते.
२. गरम पाणी आणि डिटर्जंट पावडर :- सर्वातआधी एका टबमध्ये हलके गरम पाणी घ्या. आता यामध्ये १ झाकण डिटर्जंट पावडर मिसळा. हा उपाय रात्री केल्यास अधिक फायदा होईल. रात्री सर्व डबे पाण्यात टाकून रात्रभर तसेच भिजत ठेवा. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर डब्यांवर जमलेली घाण साफ करण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. आपण ती घाण सहजपणे साफ करू शकतो. हा डबे साफ करण्याचा सोपा उपाय आहे. या उपायामुळे प्लास्टिकच्या डब्यांवरील चिकट, पिवळे डाग सहज निघून जातात.
दिवाळीचा फराळ झटपट होण्यासाठी खास टिप्स! गडबड - गोंधळ न होता, पदार्थ न बिघडता करा झटकेपट पदार्थ...
३. डिशवॉश लिक्विड आणि मीठ :- ही खास ट्रिक वापरुन तुम्हाला डबे स्वच्छ करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो, पण प्लास्टिकचे डबे आणि कंटेनर नव्यासारखे चमकू लागतील. यासाठी एका बाऊलमध्ये थोडेसे डिशवॉश लिक्विड घ्या. त्यात २ चमचे जाडे मीठ घाला. आता हे मिश्रण डब्यांवर लावून स्क्रबर किंवा कापडाच्या मदतीने हलक्या हाताने घासून घ्या. ५ मिनिटांनंतर लगेच ब्रशने घासून साफ करा. आपण पाहू शकता की, डब्यांवरील घाण सहजपणे निघून जाईल. मिठाचे कण जाड असल्यामुळे चिकटपणा काढायला मदत होते. यामुळे प्लास्टिकच्या डब्यांतील दुर्गंध देखील दूर करता येतो.