दिवाळीची साफसफाई सर्वच घरांमध्ये सुरू आहे. घरातील सिलिंग फॅन (Ceiling Fan) स्वच्छ करणे हे एक मोठे आणि त्रासदायक काम वाटू शकते, कारण त्यासाठी शिडीवर चढावे लागते. परंतु, शिडीचा वापर न करताही पंखा प्रभावीपणे स्वच्छ करण्याचे अनेक सोपे आणि सुरक्षित मार्ग आहेत, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि कामही व्यवस्थित होईल. पंखा सोप्या पद्धतीनं कसा साफ करायचा याच्या स्टेप्स पाहू. पंखा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन मुख्य वस्तूंची गरज आहे. एक उशीचे कव्हर. जुने किंवा न वापरलेले. लांब दांड्याची मोपिंग स्टिक किंवा झाडू जो पंख्याच्या उंचीपर्यंत सहज पोहोचू शकेल. (The Ultimate Hack to Clean Your Ceiling Fan Safely and Easily)
१) सुरक्षितता पाहा-पंखा स्वच्छ करण्यापूर्वी, सर्वप्रथम त्याचा मेन पॉवर सप्लाय पूर्णपणे बंद करा. घरात मेन स्विच असेल, तर तो बंद करणे अधिक सुरक्षित आहे.
२) कव्हर घाला: उशीचे कव्हर हातात घ्या आणि पंख्याच्या एका पात्यावर ते हळूवारपणे घाला. पात्यावर जमा झालेली धूळ आणि घाण पंख्याच्या खाली न पडता थेट कव्हरच्या आत जमा होईल.
३) पुसून घ्या: कव्हर पात्यावर घातल्यावर, ते पात्याच्या टोकापासून फॅनच्या मध्यभागापर्यंत हलके दाबून ओढा. यामुळे पात्यावरील सर्व धूळ कव्हरमध्ये अडकून जाईल.
४) पुन्हा वापरा: कव्हर पात्यावरून काढल्यावर, ते झाडून किंवा झटका देऊन स्वच्छ करा. त्यानंतर, पंख्याच्या पुढील पात्यांसाठी हीच प्रक्रिया पुन्हा करा.
५) बारीक सफाई: कव्हरने मुख्य धूळ काढल्यानंतर, तुम्ही लांब दांड्याच्या मोपिंग स्टिकला एक स्वच्छ, ओलसर मायक्रोफायबर कापड गुंडाळून पात्यांच्या कडा किंवा पंख्याचा मध्यभाग हलके पुसू शकता.
६) धूळ कमी करा: शक्य असल्यास पंखा पुसताना जमिनीवर एक जुने वर्तमानपत्र किंवा चादर पसरवा, ज्यामुळे चुकून खाली पडलेली धूळ गोळा करणे सोपे होईल. या पद्धतीमुळे शिडीवरून पडण्याचा धोका टळतो, तसेच पंख्याची धूळ जमिनीवर किंवा फर्निचरवर न पसरता थेट कव्हरमध्ये जमा होते. ही पद्धत खूप जलद आणि प्रभावी आहे. नियमितपणे या पद्धतीने पंखा स्वच्छ केल्यास, तुम्हाला पुन्हा पुन्हा सखोल साफसफाई करावी लागणार नाही.