Cloth Cleaning Tips : हिवाळ्यात बऱ्याचदा लोक कपडे धुणं टाळतात. एकतर या दिवसांमध्ये ऊन कमी पडतं आणि थंडीत वापरले जाणारे कपडे हे जरा जाड असतात. त्यामुळे हे कपडे वाळायला सुद्धा बराच वेळ लागतो, योग्य ऊ न मिळाल्याने कपड्यांचा वास देखील येतो. याच कारणाने कपडे धुणं टाळलं जातं. पण आपल्याला हेही माहीत असलं पाहिजे की, कोणते कपडे रोज धुतले पाहिजे आणि कोणते कपडे आठवड्यातून केवळ २ ते ३ वेळाच धुवायला हवेत. जर आपणही याबाबत कन्फ्यूज राहत असाल तर हा लेख आपल्या कामात येऊ शकतो.
किती दिवसांनी धुवावेत कपडे?
रोज धुवायचे कपडे
अंडरगारमेंट्स, सॉक्स, जिमचे कपडे, लेगिंग्स आणि अॅक्टिव वेअर रोज आंघोळीनंतर धुवायला हवेत. अशा कपड्यांमध्ये घाम आणि जर्म्स जास्त होतात. जर हे कपडे आपण न धुता जर १ ते २ दिवसांपेक्षा जास्त वापरत असू तर इन्फेक्शनचा धोका अधिक वाढतो. हे कपडे आपल्या शरीरावर अशा अशा ठिकाणी असतात, जिथे बॅक्टेरिया जास्त असतात. त्यामुळे हे कपडे एकदा वापरल्यानंतर पुन्हा धुवायलाच हवे.
आठवड्यातून एकदा धुवायचे कपडे
थंडीच्या दिवसांमध्ये इतर दिवसांच्या तुलनेत घाम तसा कमी येतो आणि आपण एकावर एक अनेक कपडे देखील घालतो. अशात स्वेटर, टॉप, शर्ट्स आपण आठवड्यातून एकदा धुवू शकतो. असे कपडे आपण ३ ते ४ वेळ न धुताही वापरू शकतो. तसेच एसी ऑफिसमध्ये काम करणारे लोक जिन्स आणि पॅंटही आठवड्यातून ३ ते ४ वेळा रिपीट करू शकतात.
१५ दिवसातून धुवायचे कपडे
थंडीत इतर कपड्यांवर जॅकेट वापरलं जातं. जॅकेटर धूळ-माती लागू शकते. त्यामुळे ते आपण १५ दिवसातून एकदा धुवू शकता. जीन्स अशाप्रकारचे तयार केलेली असते की, आपण एकच जीन्स १५ दिवस न धुताही वापरू शकतो. उन्हाळ्यात असे जाड कपडे हवेशीर ठेवावे जेणेकरून घाम, ओलावा सुकेल.
जिमच्या कपड्यांचं काय?
एक्सपर्ट सांगतात की, घामामुळे तयार होणाऱ्या बॅक्टेरियाशिवाय जिम किंवा स्पोर्ट्स विअर स्टॅफिलोकोकस ऑरिअससारख्या बॅक्टेरियाच्या संपर्कात येऊ शकतात. ज्यांमुळे त्वचेमध्ये अॅलर्जी होण्याचा धोका वाढू शकतो. अशात गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे जिमचे घामाने भिजलेले कपडे रोज धुवायला हवेत. जर रोज धुवायला जमत नसेल तर निदान उन्हात चांगले वाळत तरी घालायला हवेत, त्यानंतरच त्यांचा वापर करावा.
बेडशीट-उश्यांचे कव्हर
रिसर्चमधून समोर आलंय की, रिसर्चदरम्यान काही लोकांनी नवीन बेडशीट आणि उश्या ४ आठवडे वापरल्या. जेव्हा ४ आठवड्यांनंतर या बेडशीट आणि उश्यांना मायक्रोस्कोपखाली बघण्यात आलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. एक महिने जुन्या बेडशीटमध्ये साधारण १ कोटींपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळले. बॅक्टेरियांची ही संख्या तुमच्या टूथब्रश स्टॅंडमध्ये असलेल्या बॅक्टेरियाच्या संख्येपेक्षा ६ पटीने अधिक आहे. तसेच ३ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ९० लाख बॅक्टेरिया, २ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ५० लाख आणि १ आठवडे जुन्या बेडशीटमध्ये ४५ लाख बॅक्टेरिया होते.
टॉवेल किती दिवसांनी धुवावा?
जर तुम्हाला कोणत्या प्रकारचा आजार किंवा स्कीन इन्फेक्शन नसेल तर टॉवेल दर तीन ते चार दिवसांनी धुवावा. जर एखादं इन्फेक्शन असेल तर टॉवेल रोज धुवावा आणि उन्हात वाळत घालावा. उन्हात टॉवेल वाळत घातल्याने त्यातील बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट होतात.
