Join us  

मैदा आणि तांदुळाच्या पिठातली भेसळ ओळखायची कशी? सावध व्हा, विकतच्या पिठातली भेसळ 'अशी' शोधा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 5:53 PM

सणावाराच्या तोंडावर पैसे कमावण्यासाठी अनेक पदार्थांमध्ये भेसळ करण्यात येते. मैदा आणि तांदळाच्या पीठातील भेसळ ओळखण्याची सोपी चाचणी

ठळक मुद्देभेसळीमुळे आरोग्यावर घातक परीणाम होऊ शकताततेव्हा वेळीच सावध व्हा आणि अन्नातील भेसळ ओळखा

दिवाळी ऐन तोंडावर आली असताना किराणा मालाच्या खरेदीत वाढ होते. फराळाच्या पदार्थांसाठी स्त्रिया मोठ्या प्रमाणात किराणा खरेदी करतात. यातही फराळाची विक्री करणारे लोकही पोत्याने किराणा घेताना दिसतात. असे असताना ऐन सणावाराच्या तोंडावर तुमच्या घरातील किराण्यात भेसळ होत असेल तर? त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे असून मैदा आणि तांदूळ पिठातील भेसळ ओळखण्यासाठी सज्ज व्हा. याबाबत दरवर्षी जागृती करण्यात येते, अशाप्रकारचे गुन्हे केलेल्यांना शासनही होते. मात्र जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या अट्टाहासापायी लुटारु लोक अशाप्रकारचा चुकीचा धंदा करत असल्याचे समोर येते. सणावारांमध्ये मैदा आणि तांदळाचे तयार पीठ अनेक पक्वान्नांसाठी वापरले जाते. शुभ्र पांढऱ्या रंगाच्या या पीठात बोरीक अॅसिडची भेसळ होत असल्याचे समोर येते. याचा आरोग्यावर विपरित परीणाम होत असून अशाप्रकारे आपल्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे दिसते. 

ही भेसळ ओळखण्यासाठी फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथॉरीटी ऑफ इंडियाकडून (FSSAI) माहिती देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका व्हिडियोच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. जवळपास १ मिनिटांच्या या व्हिडियोला नेटीझन्सनी मोठी पसंती दिली असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. यामध्ये FSSAI ने एक सोपी चाचणी सांगितली असून त्याच्या माध्यमातून तुम्ही मैदा आणि तांदळाच्या पिठातील भेसळ अगदी सहज ओळखू शकता. एका टेस्ट ट्यूबमध्ये १ ग्रॅम मैदा घेऊन त्यात थोडे पाणी घाला. त्यात हळदीचा कागद टाकायचा. हा मैदा भेसळविरहीत असेल तर हा कागद पिवळाच राहतो. पण जर या मैद्यात बोरीक अॅसिडची भेसळ असेल तर मात्र हा कागद लाल रंगाचा होतो. त्यामुळे तुमचा कागद जर लाल झाला तर मैद्यामध्ये भेसळ आहे हे वेळीच ओळखा. 

( Image : Google)

बोरीक अॅसिड पावडरचा रंग पांढराच असल्याने साध्या डोळ्यांनी मात्र ही भेसळ ओळखता येऊ शकत नाही. अशाप्रकारे तुम्ही तांदळाच्या पीठाचीही चाचणी करु शकता. त्यामुळे सणावारादरम्यान किराणा आणताना गाफील राहू नका तर भेसळ ओळखण्यासाठी अशाप्रकारच्या सोप्या चाचण्या घरच्या घरी नक्की करुन बघा.  त्यामुळे तुम्ही आरोग्यवर भेसळीचे होणारे दुष्परिणाम वेळीच ओळखू शकाल आणि स्वत:चा बचाव करु शकाल. तसेच अशाप्रकारे चुकीचे काम करणाऱ्यांना शासन घडवू शकाल. 

टॅग्स :सोशल व्हायरलट्विटरआरोग्य