घर रोज झाडले – पुसलेले, स्वच्छ आणि नीटनेटके दिसत असले तरीही काही ठिकाणी नकळतपणे जंतू, बक्टेरिया साठत असतात. अनेकदा आपण फक्त डोळ्यांना दिसणारीच घाण स्वच्छ करतो, पण रोज वापरात असलेल्या काही वस्तू या देखील जंतूंचे मोठे घर असू शकतात. स्वयंपाकघर, बाथरूम किंवा बेडरूम स्वच्छ असले तरी हाताला लागणाऱ्या किंवा वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर घातक बॅक्टेरिया वाढू शकतात. याचा परिणाम आरोग्यावर होऊन सर्दी, खोकला, त्वचेचे त्रास किंवा पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे घर स्वच्छ दिसते म्हणून ते पूर्णपणे जंतूमुक्त आहे असे समजणे चुकीचे ठरू शकते. शक्यतो घराची साफसफाई करताना आपण डोळ्यांना दिसणारीच घाण आणि धूळ स्वच्छ करतो, याव्यतिरिक्त इतर घराच्या कानाकोपऱ्यात आपले लक्ष देखील जात नाही. दुर्दैवाने, अशा लपलेल्या घाण जागांवर किंवा कानाकोपऱ्यात आपले लक्ष क्वचितच जाते, परंतु आरोग्याच्या दृष्टीने त्यांची दररोज साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे(household items dirtier than toilet seat).
घरातील काही वस्तूंची रोज स्वच्छता करणे आवश्यक असते कारण आपण दिवसभरात सर्वात जास्त वेळा यांच वस्तूंना स्पर्श करतो. परिणामी, या वस्तूंवर साचलेली घाण आणि कीटाणू हातांच्या माध्यमातून सहजपणे आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि आपल्याला आजारी पाडू शकतात. घरातील अशा ५ गोष्टींबद्दल जाणून घेऊयात की ज्यामध्ये (5 household items dirtier than toilet seat) सर्वात जास्त घाण आणि बॅक्टेरिया लपलेले असतात.
बाथरुम मधील टॉयलेट सीटपेक्षा जास्त 'या' ५ जागांवर असतात बॅक्टेरिया...
१. किचन स्पंज आणि डिश क्लॉथ (Kitchen Sponge and Dish Cloth) :- तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण घरातील सर्वात अस्वच्छ जागा टॉयलेट सीट नसून किचन स्पंज असू शकतो. किचन स्पंज बहुतेक वेळा ओला असतो आणि त्यामध्ये अन्नाचे बारीक कण अडकून राहतात. ही आर्द्रता आणि अन्नाचे कण बॅक्टेरिया वाढण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार करतात, ज्यामुळे कीटाणू वेगाने पसरतात. आरोग्य जपण्यासाठी दर आठवड्याला जुना स्पंज बदलून नवीन वापरावा. प्रत्येक वापरानंतर स्पंज आणि डिश क्लॉथ स्वच्छ धुवून पूर्णपणे सुकवावेत.
२. दरवाजाचे हँडल आणि स्विच बोर्ड (Door Handles and Switch Boards) :- आपण दिवसभरात असंख्य वेळा घराच्या दरवाजाचे हँडल आणि लाईटचे स्विचला स्पर्श करतो, पण साफसफाईच्या वेळी मात्र या गोष्टींकडे सहसा दुर्लक्ष होते. जेव्हा आपण बाहेरून येतो, तेव्हा आपल्या हातातील कीटाणू सर्वात आधी याच जागांवर स्थिरावतात. घरातील प्रत्येक सदस्य या वस्तूंना वारंवार हात लावत असतो, ज्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. आठवड्यातून किमान दोनदा चांगल्या डिसइन्फेक्टेंट वाइप्स (Disinfectant wipes) किंवा सॅनिटायझरच्या मदतीने सर्व हँडल आणि स्विच बोर्ड पुसून काढावेत.
३. रिमोट कंट्रोल आणि मोबाईल फोन (Remote Control and Mobile Phone) :- आजच्या काळात स्मार्टफोन आणि टीव्ही रिमोट हे जणू आपल्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत. पण, हीच उपकरणे कीटाणूंचे सर्वात मोठे वाहक असू शकतात. आपण जेवताना, बेडवर आणि अनेकदा तर चक्क टॉयलेटमध्येही मोबाईलचा वापर करतो. या उपकरणांवर आपल्या हातातील घाम, तेल आणि वातावरणातील धूळ यांचा थर साचतो. या साचलेल्या थरामुळे बॅक्टेरिया वाढतात, जे विविध इन्फेक्शनचे कारण बनू शकतात. इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी खास बनवलेले क्लीनर किंवा ७०% आयसोप्रोपिल अल्कोहोल (Isopropyl Alcohol) असलेल्या वाइप्सचा वापर करून हे नियमितपणे पुसून काढावेत.
४. कटिंग बोर्ड किंवा चॉपिंग बोर्ड (Cutting Board / Chopping Board) :- भाजीपाला किंवा फळे कापण्यासाठी वापरला जाणारा चॉपिंग बोर्ड वरून स्वच्छ दिसत असला तरी, त्याच्यावर पडलेल्या भेगांमध्ये बॅक्टेरिया सहजपणे लपून बसतात. जर तुम्ही लाकडी चॉपिंग बोर्ड वापरत असाल, तर त्यात ओलावा टिकून राहतो आणि बॅक्टेरिया वेगाने वाढतात. जर आपण एकाच बोर्डवर नॉनव्हेज पदार्थ आणि भाज्या कापत असाल, तर नॉनव्हेज पदार्थांतील घातक जीवाणू भाज्यांमध्ये जाण्याची शक्यता असते. यालाच 'क्रॉस-कंटामिनेशन' म्हणतात, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. शक्य असल्यास नॉनव्हेज आणि भाज्या चिरण्यासाठी वेगवेगळे बोर्ड वापरावेत. प्रत्येक वापरानंतर चॉपिंग बोर्ड गरम पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवावा आणि तो पूर्णपणे सुकल्यानंतरच कपाटात ठेवावा.
५. टूथब्रश होल्डर (Toothbrush Holder) :- आपण दातांच्या स्वच्छतेबाबत खूप जागरूक असतो, पण ज्या होल्डरमध्ये आपण टूथब्रश ठेवतो, त्याच्या स्वच्छतेकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करतो. टूथब्रश होल्डर सहसा बेसिन किंवा सिंकच्या जवळ असतो. सततच्या ओलाव्यामुळे आणि बाथरूममधील हवेत तरंगणाऱ्या सूक्ष्म कीटाणूंमुळे होल्डरमध्ये घाण साचते. ओलावा साचून राहिल्यामुळे होल्डरच्या तळाशी काळी बुरशी जमा होऊ लागते, जी आरोग्यासाठी घातक आहे. आठवड्यातून किमान एकदा टूथब्रश होल्डर गरम पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवावा. होल्डर अशा जागी ठेवा जिथे हवेचा वावर चांगला असेल, जेणेकरून तो लवकर सुकेल.
