Cloth Cleaning Tips : हिवाळ्यात पुरेसं उन्ह पडत नसल्याने धुतलेल्या कपड्यांमध्ये ओलसरपणा राहण्याची आणि दुर्गंधी येण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. अनेकदा आपण कपडे धुऊन कपाटात घड्या करून ठेवतो, पण काही दिवसांनी ते काढल्यावर त्यांना वास येऊ लागतो. कपड्यांमध्ये असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसमुळे असं होतं. ज्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. यामुळे ते कपडे घालताना अस्वस्थताही वाटते. अशा परिस्थितीत कपडे योग्य पद्धतीने धुणे आणि त्यांना सुगंधी ठेवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय अवलंबणे गरजेचे आहे.
लिंबाचा रस
लिंबाचा रस फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर कपड्यांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. ओले कपडे धुतल्यानंतर त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि हलक्या हाताने कपडे नीट चोळा. लिंबाचा रस कपड्यांतील बॅक्टेरिया नष्ट करतो, त्यामुळे वास पूर्णपणे जातो. तसेच लिंबाचा हलका आंबट सुगंध कपड्यांना ताजेपणा देतो.
व्हिनेगर
व्हिनेगर हा सु्द्धा एक नैसर्गिक उपाय आहे, जो कपड्यांची स्वच्छता आणि ताजेपणा दोन्ही राखण्यास मदत करतो. ओल्या कपड्यांमध्ये व्हिनेगरचे काही थेंब टाका आणि हळूहळू मिसळा. व्हिनेगरने बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कपड्यांची दुर्गंधी पूर्णपणे जाते. शिवाय व्हिनेगरने कपड्यांचा रंगही सुरक्षित राहतो, कपड्यांचा रंग दीर्घकाळ टिकून राहतो. व्हिनेगर वापरल्यानंतर कपडे नेहमीप्रमाणे धुवा.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा असा घरगुती उपाय आहे, जो कपड्यांमधील दुर्गंधी शोषूण घेण्यास आणि स्वच्छता राखण्यास मदत करतो. ओल्या कपड्यांमध्ये बेकिंग सोडा मिसळल्यास त्याचा गंध टिकून राहतो. तो कपड्यांमध्ये साचलेला मळ आणि बॅक्टेरिया नष्ट करतो. बेकिंग सोडा वापरण्यासाठी कपड्यांवर थोडा शिंपडा किंवा पाण्यात विरघळवून कपडे काही वेळ त्या पाण्यात भिजत ठेवा. नंतर नेहमीप्रमाणे कपडे धुवा. यामुळे कपडे दीर्घकाळ सुगंधी आणि ताजेतवाने राहतात.
लॅव्हेंडर तेल
लॅव्हेंडर तेल फक्त आपल्या सुगंधासाठीच नाही, तर कपडे ताजे ठेवण्यासाठीही उपयोगी ठरतं. ओल्या कपड्यांमध्ये लॅव्हेंडर तेलाचे ४–५ थेंब टाका आणि नीट मिसळा. हे तेल बॅक्टेरिया नष्ट करतं आणि दुर्गंधी पूर्णपणे दूर करतं. याशिवाय याचा सुगंध कपड्यांमध्ये बराच काळ टिकून राहतो. लॅव्हेंडर तेल वापरल्यानंतर कपडे नेहमीच्या पद्धतीने धुवा.
