How to get rid of Spiders: दिवाळीचा सण अगदी दारात आला आहे आणि बहुतांश घरांमध्ये साफसफाईची लगबग सुरू झाली आहे. काही घरांमध्ये सफाई झाली सुद्धा असेल. पण अनेकदा असं होतं की आपण घर स्वच्छ करून घेतल्यानंतर काही दिवसांतच भिंतींवर पुन्हा कोळी जाळं विणतात. ही जाळी केवळ घराचं सौंदर्य बिघडवत नाहीत, तर घाण आणि नकारात्मकतेची भावना देखील निर्माण करतात. अशा वेळी काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही कोळ्यांपासून कायमस्वरूपी सुटका मिळवू शकता. चला जाणून घेऊ या हे सोपे उपाय.
पुदिन्याचं तेल
घरातल्या कोळ्यांना दूर ठेवण्यासाठी पुदिन्याचं तेल खूप प्रभावी ठरतं. कीटकांना या पानांचा सुगंध अजिबात आवडत नाही. पुदिन्याचं तेल पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत भरा आणि ज्या ठिकाणी कोळ्यांची जाळी दिसतात तिथे फवारणी करा. काही दिवसांत फरक जाणवेल.
व्हिनेगर स्प्रे
कोळ्यांना हाकलण्यासाठी व्हिनेगर उत्तम उपाय आहे. एक भाग व्हिनेगर आणि एक भाग पाणी एकत्र करून स्प्रे बाटलीत भरा. मग हे मिश्रण त्या भिंतींवर किंवा कोपऱ्यांवर स्प्रे करा जिथे कोळी नेहमीच जाळी विणतात. आठवड्यातून एक ते दोन वेळा हा स्प्रे केल्यास समस्या कमी होईल.
लिंबाच्या सालीचा वापर
लिंबाचा आंबटपणा कीटकांना दूर ठेवतो. त्यामुळे लिंबाच्या साली कोळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. लिंबाच्या साली उन्हात वाळवून त्यांचा बारीक चुरा तयार करा आणि ती पावडर स्प्रे बाटलीत भरून घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडा. या सुगंधामुळे कोळी लगेच पळून जातात. हवं असल्यास संत्र्याच्या सालीचाही वापर करू शकता.
घराची नियमित साफसफाई करा
कोळी पुन्हा जाळं विणू नयेत म्हणून आठवड्यातून किमान एकदा भिंतींवर झाडू लावा. तसेच घरात कुठे भेगा किंवा ओलसर जागा असल्यास ती दुरुस्त करा, कारण अशा ठिकाणी कीटक पटकन घर करतात.
अशा प्रकारे हे सोपे नैसर्गिक उपाय अवलंबून तुम्ही दिवाळीपूर्वी घरातील कोळ्यांना कायमचा निरोप देऊ शकता आणि स्वच्छ, सुंदर घराचा आनंद घेऊ शकता.