अंजना देवस्थळे (लेखिका हॉर्टिकल्चरिस्ट आहेत.)
निसर्गाची नवीन वर्षाची शोभायात्रा निघाली आहे..! पिंपळ हिरव्या, गुलाबी, पोपटी रंगांच्या लांब देठांच्या, चकचकित पानांच्या पताका बांधून सज्ज आहे.
मधुमालती, मोरवेल, उक्षीच्या वेलींनी तोरणं बांधली आहेत. बहाव्याचं सोनेरी झुंबर डुलत आहेत.
सरोवरात कमळं फुलली आहेत. सोनमोहोर, मोह, शिवण यांच्या फुलांनी जमिनीवर रांगोळ्या, पायघड्या घातल्या आहेत. करंज, कुसुम, आंबा यांनी चकचकित रेशमी पर्णांचा शालू नेसून गुढी उभारली आहे. कोकिळेचे मधुर स्वर, बुलबुलची आनंदमयी शीळ–शिट्टी, भ्रमराचे गुंजन झाडाफुलांच्या सुगंधी यात्रेत संगीतसाथ करत आहेत. निसर्गाची नववर्षाच्या स्वागताची अशी जय्यत तयारी सुरू आहे. तशी म्हणायला ही दरवर्षीची गोष्ट; पण चैत्राची चाहूल लागताच शिशिरतल्या सुप्तावस्थेतून सृष्टी जागी होते.
ऋतू बदलतो आणि सगळी काया पालटते. निष्पर्ण झाडांवर रंगीत फुलं बहरू लागतात.
चैत्रपालवी फुलांसारखीच रंगीत आणि मोहक असते. पक्ष्यांचे सुगीचे दिवस येतात.
पळस, सावर, पांगऱ्यावर पक्ष्यांच्या टोळ्या मधुरस चोखायला येऊन बसतात.
पक्ष्यांचा बघण्या-दाखवण्याचा आणि मिलनाचा हाच मौसम. नर पक्ष्यांचा पिसारा अधिक रंगीत होतो. ‘ते’ नटून-थटून, शिट्ट्या मारत, गाणी गात जोडीदाराला पटवण्यासाठी उडतात.
सर्वत्र अगदी जंगलात, रानावनात, खेडोपाड्यांत आणि सिमेंटच्या शहरांतही नवनिर्मिती, नवं चैतन्य, नवीन उत्साह पसरू लागतोच.
निसर्गाचा आनंदोत्सव सुरू झालेला दिसेलच पाहा आपल्या अवतीभोवती सर्वत्रच..
निसर्गाच्या या सुगंधी-रंगागंधाच्या बहराचं अनुकरण करत तर माणसालाही नवीन वर्षाची संकल्पना सुचली असावी.
आपल्याकडे संपूर्ण भारतात याच सुमारास देशभरात पारंपरिक रीतीने नवीन वर्षांचं स्वागत केलं जातं.
त्यामागे धार्मिक आणि निसर्गाशी जोडलेली कारणं आहेत.
चंद्रपंचांगाप्रमाणे काही ठिकाणी चैत्र महिन्यात, तर सौरपंचांगाप्रमाणे सूर्य मेष राशीत प्रवेश करतो त्या दिवशी, म्हणजे वैशाखात नववर्ष साजरं केलं जातं.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला गुढीपाडवा; कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणात उगादी; काश्मिरी पंडितांचा नवरेह; सिंधी लोकांचा चेतीचंद आणि वैशाखात केरळचा विशू, बंगालचा पोईला बैसाख, आसामचा रोंगाली बिहू असे सारे सणउत्सव आगेमागेच साजरे हाेताना दिसतात.
सण कुठल्याही प्रांतातला असो, साजरा करताना त्यात एक समान धागा आहे तो म्हणजे निसर्ग.
निसर्गाचं नवंनवं होत जगण्यात बहार आणणं, रंगागंधाची उधळण करणं, आनंदाची गुढी उभारणं साजरं केलं जातं ते मनापासून..!
भारतभरात नववर्षाचे उत्सव कसे साजरे होतात?
महाराष्ट्र
दाराला आंब्याची डहाळी, आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण बांधून, दारात केळीचे खांब रोवून प्रकृतीचे घटक घरात आणण्याची परंपरा सर्वत्र आहे. आपल्याकडे गुढीपाडव्याला कितीही गोडधोड केलं तरी, सणाचा केंद्रबिंदू असते ती इवलीशी, नाजूक पांढऱ्या फुलांची कडुनिंबाची छोटीशी फांदी.
गुढी उभारून तिला कडुनिंबाच्या फुलांची डहाळी बांधण्याची प्रथा आहे.
पक्वान्नं भलेही वेगवेगळी असोत, कडुनिंबाच्या पानांची कडू औषधी चटणी किंवा उगादीची पचडीचं सेवन करणं हे साम्य आहे.
मध्य भारतात सालवृक्ष फुललेला असताना एखाद्या जंगलात शिरलात तर मंतरलेल्या विश्वात आल्याचा भास होतो.
दुधाळ रंगाचे, मंद सुवासाचे मोठाले घोस घेऊन हे वृक्ष लदबदलेले असतात.
झारखंड-छत्तीसगड
झारखंडमध्ये सालचं फुलणं, छत्तीसगडमध्ये मुंडा, संथाल वनवासी समाजाला नव्या वर्षाची चाहूल लावते आणि ‘सरहूल’ सण साजरा केला जातो.
सरहूलचा अर्थ ‘वृक्षपूजन’ असा होतो. धरणीची पूजा करून तिला ही फुलं वाहिली जातात आणि हीच फुलं केसांतही माळली जातात.
काश्मीर
नवरेह हा काश्मिरी पंडितांचा नवीन वर्षसण. बर्फाच्छादित काश्मीरमध्ये खऱ्या अर्थाने वसंताचं आगमन होतं.
बर्फ थिजतो, घरात अडकलेले लोक बाहेर पडतात, एकमेकांच्या भेटीगाठी होतात.
बागा, बाजार माणसांनी भरून जातात, कहावा–केशरचा सुवास वातावरण भरून टाकतो.
माणसंच नव्हे, तर बर्फाखाली दडलेली सुवासिक नर्गिसची सुंदर फुलं डोकावतात.
बदामाचे वृक्ष बहरतात; त्यांच्या नाजूक गुलाबी फुलांनी झाडं एखाद्या भव्य गुलाबी छत्रीसारखं दिसतं.
गोठलेल्या नद्या परत वाहू लागतात. थंडीमुळे स्थलांतर केलेले पक्षी हळद्या, हिमालयन मैना परत येतात आणि त्यांचे मधुर स्वर पुन्हा ऐकू येतात.
सगळीकडे आनंदी–आनंद असतो.
उत्तराखंड
हिमालयातल्या नववर्षाचा असाच एक अतिशय सुंदर सण उत्तराखंडच्या गढवाल, कुमाऊन भागात साजरा केला जाणारा वसंत आणि सुगीचा सण. ‘फूल देई’ म्हणतात त्याला. म्हणजे फुलं अर्पण करणं. लहान मुली सकाळी सकाळी नटूनथटून रानात जाऊन बुरांशची, सरसो–मोहरीची पिवळी धम्मक फुलं आणि इतर फुलं घेऊन येतात.
‘तुमच्या घरात आनंद नांदो, अन्नधान्याची भरभराट होवो’ अशी गाणी गात त्या ही फुलं लोकांच्या उंबरठ्यांवर ठेवतात.
लोक कौतुकाने त्यांना गूळ, तांदूळ, मिठाई, नाणी देतात.
ते सगळं जमा करून देवीला नैवेद्य केला जातो आणि सगळे एकत्र भोजन करतात.
आसाम
आसामचा रोंगाली बिहू. त्यालाच बोहाग बिहू असंही म्हणतात.
सोनेरी मुगा रेशमाचे मेखला चादोर नेसून, केसात ‘कोपौ फूल’ माळून मुली–स्त्रिया नटतात.
केसांत कोणतंही दुसरं फूल किंवा गजरा चालत नाही बरं का; कोपौ फूलच हवं.
हे कोपौ फूल म्हणजे आपल्याकडं आपण ज्याला सीतेची वेणी म्हणतो तेच फूल.
ही एक आमरी किंवा ऑर्किड आहे, जी मोठ्या वृक्षांचा आधार घेऊन त्यांच्यावरच वाढते.
ते नाजूक गुलाबी फुलांचे घोस अत्यंत मोहक दिसतात.
कोपौ फूल आसामचं राज्यफूल आहे, यात नवल नाही.
नव्या वर्षाचं स्वागत असं फुलापानांनी होतं, निसर्गाचं फुलणं बहरणं नवं नवं होणं असं सर्वदूर भारतात साजरं केलं जातं.
