Assam Menstruation Tradition: लेकीच्या पहिल्या मासिक पाळीचा आनंद वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. जुन्या रूढी-परंपरा, मान्यता सोडून लेकीची पहिली मासिक पाळी सेलिब्रेट केली जाते. मासिक पाळीसंबंधी अशाच एका वेगळ्या परंपरेबाबत आज आपण पाहणार आहोत, जी भारतात पार पाडली जाते. आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण देशातील एका भागात लेकीच्या पहिल्या मासिक पाळीनंतर तिचं लग्न एका केळ्याच्या झाडासोबत लावलं जातं. पण असं का केलं जातं आणि यामागची काय मान्यता आहे हेच आपण पाहुयात.
आसाममधील अनोखी परंपरा
आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, आसामच्या काही भागांमध्ये आजही ही परंपरा पाळली जाते. जेव्हा एखाद्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते, तेव्हा तिला घरच्यांपासून वेगळं ठेवलं जातं. म्हणजेच काही दिवस ती आपल्या कुटुंबापासून दूर राहते आणि तिच्यावर सूर्यप्रकाश देखील पडू दिला जात नाही. त्यानंतर तिचं लग्न एका केळ्याच्या झाडाशी लावलं जातं. महत्वाची बाब म्हणजे हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडलं जातं. या विवाहाला 'तोलिनी ब्याह' म्हणजे लग्न म्हटलं जातं. आसाममधील बोंगाईगाव जिल्ह्यातल्या सोलमारी गावात ही परंपरा आजही सुरू आहे.
नाच-गाणी आणि जल्लोष
एखाद्या सामान्य लग्नाप्रमाणेच या झाडाशी होणाऱ्या लग्नातही लोक साजरा करतात, यावेळी गाणी गायली जातात आणि नाचही केला जातो. या जल्लोषात मुलीचं संपूर्ण कुटुंब सहभागी होतं. या काळात मुलीला खाण्यासाठी फक्त फळं दिली जातात. लग्नानंतर मुलगी पूर्वीसारखं आयुष्य जगायला लागते.
मुलीला पहिली मासिक पाळी आल्यानंतर होणारं हे लग्न तिचं पहिलं लग्न मानलं जातं. मात्र मुलगी मोठी झाल्यावर आणि तिच्या खर्या लग्नासाठी वय झाल्यावर, तिच्यासाठी मुलगा शोधला जातो आणि तिचं खरं लग्न लावलं जातं. म्हणजेच ही फक्त अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, जी आजही पाळली जाते.
मुलीच्या पहिल्या मासिक पाळी इथे उत्सवासारखी साजरी केली जाते. या लग्नाला 'छोटं लग्न' असंही म्हटलं जातं. इतकंच नाही तर देवीचं आगमनही मानलं जातं.