Join us

हे फक्त मुलीच करु शकतात! फुग्यांसाठी पैसे नाहीत म्हणून वडिलांच्या वाढदिवसाला चिमुकल्यांनी असे केले सेलिब्रेशन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2022 15:21 IST

Girl Celebrated Father Birthday In Special Way Viral Photos : वडिलांच्या वाढदिवसाला फुगे आणायला पैसे नव्हते तर मुलींनी पिशव्यांमध्ये हवा भरुन वाढदिवस साजरा केला.

ठळक मुद्देमुली वडिलांसाठी आणि वडील मुलींसाठी किती खास असतात आपल्याला माहितीये...पैसा हिच संपत्तनी नसते तर नात्यात प्रेमाने एकमेकांसाठी केलेल्या गोष्टी हिच खरी संपत्ती असतात...

मुली वडिलांसाठी कायमच खास असतात. मुलींचे आणि वडिलांचे नाते किती खास असते हे आपण अनेकदा प्रत्यक्ष अनुभवतो तर काही वेळा आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटनांवरुन आपल्याला त्याची प्रचिती येते. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात आपल्या वडिलांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी चिमुकल्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. वाढदिवसाला घर सजवण्यासाठी फुगे आणायला पैसे नाहीत म्हणून या चिमुकल्यांनी प्लास्टीकच्या पिशव्यांचे फुगे तयार केले आणि त्यावर हॅपी बर्थडे पापा लिहून वडिलांना शुभेच्छा दिल्या (Girl Celebrated Father Birthday In Special Way Viral Photos). 

सुमित ओरछा यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट आणि फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये ते म्हणतात, सुख हे संपत्तीवर अवलंबून नसते. वडिलांच्या वाढदिवसाला फुगे आणायला पैसे नव्हते तर मुलींनी पिशव्यांमध्ये हवा भरुन वाढदिवस साजरा केला. त्यामुळेच मुली मिळायला भाग्य लागते असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून या मुलींचे बरेच कौतुक होत आहे. ३७०० जणांनी आतापर्यंत ही पोस्ट लाईक केली असून ५८ जणांनी ती शेअर केली आहे. इतकेच नाही तर या वडिलांना असंख्य जणांनी शुभेच्छा दिल्या असून प्रतिक्रियांमध्ये मुलींचेही कौतुक केले आहे. 

मुली कायमच खास असतात, भावनिक असल्याने त्या परिस्थिती समजून घेऊन आनंद साजरा कसा करायचा याचा मार्ग शोधतात, हेच या फोटोमधून दिसून येते. कठिण परिस्थितीतही आपल्या वडिलांचे मन जपण्यासाठी या चिमुकल्यांनी घातलेला हा घाट त्यांचे वडिलांप्रती असलेले प्रेमच दाखवून देतो. पत्र्याची शेड असलेल्या घराच्या वरच्या बांबूंना या लहानग्यांनी पिशव्यांचे केलेले फुगे अतिशय छान पद्धतीने लावल्याचे दिसते. आता हा फोटो नेमका कुठला आहे हे मात्र समजू शकले नाही. पण सोशल मीडियावर या बाप-लेकींच्या प्रेमाची विशेष चर्चा आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल फोटोज्रिलेशनशिप