How to clean pillow: उशीचा वापर आपण रोज करत असतो. रात्रभर उशी डोक्याखाली असते. त्यामुळे केसांचं तेल, केसांमधील धूळ - कोंडाही उशीवर चिकटतो. त्यामुळे उशीचं कव्हर नियमितपणे धुणं गरजेचं असतं. सामान्यपणे उशीचे कव्हर स्वच्छ करण्यावर अधिक भर दिला जातो. पण उशीच्या आतील स्वच्छतेकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. उशी धुवून स्वच्छ करणं आणि वाळवणं यात वेळही भरपूर जातो. अशात उशी स्वच्छ करण्यासाठी आम्ही आपल्याला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
उन्हात ठेवा
उशी स्वच्छ करण्यासाठी आपण उन्हाची मदत घेऊ शकता. उशी काही तासांसाठी उन्हात ठेवा. असं केल्याने उशीमधील बॅक्टेरिया नष्ट होतात. जर उशीमधून वास येत असेल, तर उन्हामुळे हा वास दूर होतो. मधून मधून उशी पलटवायला विसरू नका. दोन्ही बाजूने उशीला चांगलं ऊन लागायला हवं. आठवड्यातून एकदा हा उपाय करणं फायदेशीर ठरू शकतं.
क्लीनिंग स्प्रे
आधी एक कप पाणी घ्या. या पाण्यात एक चमचा व्हाईट व्हिनेगर मिक्स करा. शेवटी यात २ थेंब एसेंशिअल ऑइल मिक्स करा. आपला होममेड आणि नॅचरल क्लीनिंग स्प्रे वापरण्यासाठी तयार आहे. हा स्प्रे उशीवर स्प्रे करा. जेव्हा हे मिश्रण सुकेल, उशीचा छान सुगंध येऊ लागेल.
बेकिंग सोडा
उशी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता. उशीचा वास, डाग घालवण्यासाठी बेकिंग सोडा सगळ्यात चांगला उपाय मानला जातो. यासाठी उशीवर थोडा बेकिंग सोडा शिंपडा. हा तसा ३० ते ४५ मिनिटं राहू द्या. त्यानंतर ब्रशच्या मदतीने सोडा काढू टाका.
