Join us
Daily Top 2Weekly Top 5

युगांडाला जाणाऱ्या विमानात कॅनडाच्या डॉक्टरांनी केली अवघड प्रसूती; आकाशात जन्माला आलं मीरॅकल बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 15:05 IST

कोणत्या देशात, शहरात नाही तर या बाळाचा जन्म झाला थेट विमानात

ठळक मुद्दे...म्हणून बाळाचे नाव ठेवले मीरॅकल आयेशा३५ हजार फूटांवर जन्म घेणे ही सामान्य बाब अजिबातच नाही..

रेल्वे स्टेशनवर, रेल्वेच्या डब्यात किंवा अगदी बसने प्रवास करतानाही गर्भवती महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि प्रसूती झाली असे आपण अनेकदा ऐकतो. प्रवासादरम्यान अशाप्रकारे बाळाला जन्म देणाऱ्या महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पण एका महिलेला चक्क विमानातच प्रसूतीकळा सुरू झाल्या. आता अशावेळी नेमके काय करायचे याचा निर्णय विमान कंपनीला घेणे भाग होते. तेव्हा त्यांनी एक प्रयत्न म्हणून आपल्या विमानात कोणी डॉक्टर आहे का अशी विचारणा केली. नशीबाने युगांडाला जाणाऱ्या या विमानात कॅनडाच्या एक डॉक्टर उपस्थित होत्या. नाहीतर विमान इमर्जन्सीमध्ये एखाद्या जवळपासच्या विमानतळावर उतरवावे लागले असते. पण असे करणे सोपे नसते. त्यासाठी खूप मोठी यंत्रणा कामाला लावावी लागते. पण सुदैवाने तशी वेळ आली नाही आणि कॅनडाच्या डॉक्टरांनी विमानामध्ये कोणतेही वैद्यकीय साहित्य उपलब्ध नसताना या महिलेची प्रसूती अतिशय उत्तमरितीने पार पाडली. 

डॉ. आयेशा खातीब असे या डॉक्टरांचे नाव असून त्या टोरंटो विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. आपल्या रोजच्या कामातून काही काळ विश्रांती म्हणून त्या कुठेतरी फिरायला निघाल्या होत्या. तर गर्भवती महिला सौदी अरेबियाहून आपल्या युगांडातील घराकडे जात होती. विमानात डॉक्टरांविषयी घोषणा झाल्यावर डॉ. खातीब यांनी तातडीने आपण डॉक्टर असल्याचे सांगितले आणि त्या या गर्भवती महिलेपाशी पोहोचल्या. ही प्रसूती प्रक्रिया झाली आणि गर्भवती महिलेने एका गोंडस अशा मुलीला जन्म दिला. ३५ व्या आठवड्यात जन्माला आलेले हे बाळ आणि आई सुदृढ असल्याचे डॉ. खातीब यांनी आपल्या सोबत असणाऱ्यांना सांगितले.

याच विमानात एक परिचारिका आणि डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स संस्थेचे बालरोगतज्ज्ञही होते, त्यामुळे या दोघांच्या मदतीने ही प्रसूती प्रक्रिया करणे डॉ. आयेशा यांना सोपे गेले. बाळाला जन्म देणाऱ्या महिलेचे आणि प्रसूती प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडणाऱ्या डॉक्टरांचे विमानातील प्रवाशांनी टाळ्या वाजवत कौतुक केले. ३५ हजार फूटांवर अशाप्रकारे आकाशात जन्माला आलेल्या या बाळाचे नाव सदर कॅनडीयन डॉक्टर आयेशा यांच्या नावावरुन मिरॅकल आयेशा असे ठेवण्यात आले. डॉ. आयेशा यांनी आपल्या गळ्यात अरबी भाषेत आयेशा लिहीलेली सोन्याची चेन या नवजात बाळाला भेट म्हणून दिली. आपल्याला जन्म दिलेल्या डॉक्टरांची आठवण या मुलीकडे कायम राहावी यासाठी आपण ही भेट देत असल्याचे त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले. अशाप्रकारे आपण विमानात एखादी प्रसूती करु असे आपल्याला स्वप्नातही वाटले नव्हते असे त्या म्हणाल्या. डॉ. आयेशा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या घटनेची माहिती आणि फोटो शेअर केले असून यामध्ये या बाळासोबतचे त्यांचे फोटो पाहायला मिळतात. तसेच डॉक्टरांनी आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेत मदत करणाऱ्या विमान कंपनीचे आभार मानले आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाप्रेग्नंसी