Dry lemon uses : प्रत्येक घरांमध्ये लिंबाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. बरेच लोक लिंबू घरात स्टोर करून ठेवतात आणि रोज त्यांचं लिंबू पाणी करून पितात. नाही तर त्यांचा रस वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकतात. पण अनेकदा घरात ठेवलेले लिंबू वाळतात. जे बेकार झाले म्हणून लोक फेकतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, हे वाळलेले किंवा सुकलेले लिंबू सुद्धा आपल्या खूप कामात येऊ शकतात.
खरंतर सुकलेल्या किंवा वाळलेल्या लिंबांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतो. या सुकलेल्या लिंबांचा वापर आपण चांगल्या आरोग्यासाठी आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठीही करू शकता. अशात आज आपण सुकलेल्या लिंबांचा वापर पुन्हा कसा करावा याबाबत पाहणार आहोत.
नॅचरल एअर फ्रेशनर
सुकलेल्या लिंबांचा वापर आपण नॅचरल एअर फ्रेशनरसारखा करू शकता. हे तयार करण्यासाठी सगळ्यात आधी लिंबांचे छोटे छोटे तुकडे करा आणि घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवा. याने घरात फ्रेशनेस येईल. याच्या सुगंधाने घरातील दुर्गंधी दूर होते, सोबतच वातावरण ताजं राहतं.
डाग दूर होतील
सुकलेल्या लिंबांचा वापर आपण किचनच्या ओट्यावरील किंवा भिंतींवरील डाग दूर करण्यासाठी करू शकता. यातील सिट्रिक अॅसिडमुळे तेलाचे, मातीचे किंवा कोणतेही चिकट डाग दूर करण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर यांच्या मदतीनं आपण गॅस स्टोव्ह, सिंक सुद्धा घासून साफ करू शकता.
त्वचेसाठी करा वापर
सुकलेल्या किंवा वाळलेल्या लिंबांचा वापर आपण त्वचेची काळजी घेण्यासाठीही करू शकता. याचा सोपा फेसपॅक तयार करू शकता. यासाठी वाळलेल्या लिंबांची पावडर तयार करा आणि त्यात थोडी मुलतानी माती टाकून चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक नॅचरल टॅन रिमूव्हरसारखा काम करतो. तसेच त्वचेवरील जास्तीचं तेलही काढतो.