Join us

कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 17:22 IST

Crushed Cockroaches In Coffee FDA Approved? : कॉफीत झुरळांची पावडर असतेच हा दावा खरा की खोटा?

चहा की कॉफी? भारतीयांसाठी हा यक्षप्रश्न आहे. कारण या दोन्हींचे चाहते मोठे. चहा काय टपरीवरही मिळतो, कॉफीचं कल्चर वेगळं. पण सध्या कॉफीविषयी ऑनलाइन जगात भलतीच चर्चा आहे. व्हिडिओ तर व्हायरल आहेतच अनेक लोक गुगल करकरुन शोधत आहेत, कुणी चाट जीपीटीला विचारत आहेत की ते खरं आहे का? आणि ते म्हणजे काय? की कॉफीत झुरळं असतातच(Crushed Cockroaches In Coffee)... कॉफी पावडरमध्ये १० टक्के झुरळांची पावडर मिसळलेली असते!

हे वाचून तुम्हाला शिसारी येणे, मळमळल्यासारखे होणे स्वाभाविक आहे, पण थांबा, आधी संपूर्ण माहिती वाचून घ्या. कारण, हा शोध आजचा नाही, तर १९८० मध्ये एका प्राध्यपकांना हा शोध लागला होता. जेव्हा ते अस्सल चवीची, उच्च प्रतीची कॉफी पिण्यासाठी दूरवर प्रवास करत गेले होते. कॉफीच्या बागांमध्ये पोहोचल्यावर त्यांनी तिथल्या लोकांना आपल्याबरोबर कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी आग्रह केला, तर त्यांनी नम्रपणे नकार दिला. काही काळाने प्राध्यापकांना कळले, की हा नकार कॉफीला नसून कॉफीबरोबर मिसळल्या जाणाऱ्या झुरळांना होता. 

FDA अर्थात फूड अँड ड्रग्स ऍडमीनिस्ट्रेशनची मान्यता : 

वरील संदर्भ तुम्हाला खोटा वाटू शकेल, पण एफडीएनेही सांगितलंय की हे खरं आहे.  हो! कॉफी पावडरमध्ये १० टक्के झुरळांच्या पावडरीचा समावेश असू शकतो, असा स्पष्ट उल्लेख या संस्थेने केला आहे. कॉफीमध्ये झुरळ पावडर मुद्दाम मिसळत नाहीत तर ती आपोआप मिसळली जाते. 

कसं काय?

जगभरात कॉफीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि गोदामात साठवले जाते. कॉफीच्या मादक वासाने झुरळं कॉफीकडे आकर्षित होतात. कॉफीच्या बिया आणि झुरळं सारख्याच रंगाची असल्याने तीदेखील कॉफीच्या बियांबरोबर भरडली जातात. तसे होणे स्वाभाविक आहे, असा निर्वाळा FDA ने दिल्यामुळे आता कोणाकडे दाद मागणार, हा प्रश्न अस्सल कॉफीप्रेमीसमोर उभा राहणे स्वाभाविक आहे. मात्र त्यावरही उत्तर आहे. 

मग आता कॉफी प्यायचीच नाही का?

ज्याप्रमाणे स्वस्त वस्तू तात्पुरत्या मस्त वाटत असल्या, तरी त्या दीर्घकाळासाठी परिणामकारक ठरत नाहीत. त्याचप्रमाणे स्वस्त किंमतीत मिळणाऱ्या कॉफीमध्ये अशा प्रकारची भेसळ असू शकते हे लक्षात ठेवलेलं बरं! चांगल्या ब्रॅण्डची, चांगल्या प्रतीची, चांगल्या गुणवत्तेच्या कॉफी पावडरची निवड करा, जेणेकरून तुम्ही झुरळफ्री....सॉरी, गिल्ट फ्री कॉफीचा आस्वाद घेऊ शकाल!

टॅग्स :सोशल व्हायरलअन्न