Join us  

कल्पनाशक्तीची कमालच! चक्क वापरलेल्या मास्कचा शिवला सुंदर ड्रेस; हर्ष गोयंकानीही केलं कौतुक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 5:52 PM

सोशल मीडियामुळे जगाच्या पाठीवर कुठेही काही झाले तरी ते समजणे अगदी सहज शक्य झाले आहे. विशेष म्हणजे काही मान्यवर लोक याबाबत पोस्ट करुन अनेक गोष्टींचे कौतुकही करताना दिसतात.

ठळक मुद्देकल्पनाशक्तीला सलाम, टाकाऊतून टिकाऊ ड्रेसनिर्मिती

कोणाची कल्पनाशक्ती कशी चालेल आपण सांगू शकत नाही. सध्या आपल्या सगळ्यांच्याच घरात नको असलेले किंवा जुने झालेले मास्क पडून आहेत. पण या मास्कचे काही हटके करावे असे आपल्यातील किती जणांना सुचले? नाही ना, पण एका फॅशन डिझायनरला ही कल्पना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी नुकतीच याबाबत एक पोस्ट शेअर केली आणि या फॅशन डिझायनरचे कौतुकही केले आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मास्कपासून तयार केलेले कपडे घातलेले एक जोडपे आहे. महिलेने लॉंग वन पीस घातला असून तिच्या नवऱ्याने मास्कपासून तयार केलेला कोट आणि पँट घातल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या महिलेच्या हातातील पर्सही या वाया जाणाऱ्या मास्कपासून तयार करण्यात आली आहे. हे कपल नेमके कुठले आहे, त्यांचे नाव काय याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरीही हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

हर्ष गोयंका सोशल मीडियावर नोहमीच सक्रीय असतात. आपल्या पोस्टच्या माध्यमातून ते  नेहमी काहीतरी मजेशीर आणि प्रेरणादायी शेअर करत असतात. नेटीझन्सना त्यांच्या पोस्ट खूप आवडतात आणि ते त्याची तारीफही करतात. नुकतीच त्यांनी शेअर केलेली मास्कच्या कपड्यांची पोस्ट अनेकांनी लाइक केली असून अनेकांनी या फॅशनडिझायनरच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले आहे. बऱ्याच जणांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या पोस्टला हर्ष गोयंका कॅप्शन देतात, ‘जेव्हा तुमची पत्नी फॅशन डिझायनर असते आणि तुम्ही खराब झालेल्या मास्कचा पुन्हा वापर करु इच्छिता’. अनोखी कल्पना वापरुन तयार केलेल्या या कपड्यांचा फोटो अनेकांनी रिट्विट केला आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल फोटोज्सोशल मीडियाट्विटर