Join us

कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 20:00 IST

एसीचा वापर करताना नकळत काही चुका देखील होतात, ज्यामुळे एसी बंद पडू शकतो किंवा मग त्याचा स्फोट होऊ शकतो.

उन्हाळ्यात एसीचा वापर हा हमखास केला जातो. उष्णता एवढी वाढली आहे की हल्ली अनेकांच्या घरी एसी असतोच. एसीचा वापर करताना नकळत काही चुका देखील होतात, ज्यामुळे एसी बंद पडू शकतो किंवा मग त्याचा स्फोट होऊ शकतो. बऱ्याचदा असं दिसून येतं की, काही लोक १-२ तास घराबाहेर गेल्यावरही एसी बंद करत नाहीत कारण त्यांना वाटतं की, ते परत आल्यावर रुम थंड राहिल. पण ही चूक खूप महागात पडू शकते. 

एअर कंडिशनर काही वेळानंतर बंद करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण उगाच तासनतास एसी चालू ठेवणं तुमच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतं. कोणतंही उपकरण बराच काळ सुरू राहिलं तर ते थोड्यावेळाने जास्त गरम होण्याची समस्या सुरू होते, एसीमध्येही असंच काहीसं घडतं.

किती वेळ सुरू ठेवावा एसी?

क्रोमाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, तुम्ही एसी किती वेळ सुरू ठेवावा हे तुमच्या रुमच्या आकारावर आणि तुमचा एसी किती टन आहे यावर अवलंबून असतं. जर तुम्ही एका लहान खोलीत १ टनचा एसी बसवला असेल, तर तो एसी ८ ते १० तास आरामात सुरू ठेवता येतो. पण जर तुमची खोली मोठी असेल आणि तुम्ही १.५ किंवा २ टन एसी बसवला असेल, तर तुम्ही १२ तास एसी चालवू शकता. मात्र त्यानंतर तुम्ही तुमचा एसी आठवणीने बंद करा.

तासन्तास चालू असलेला एसी गरम होऊ लागतो, ज्यामुळे एअर कंडिशनरलाही विश्रांतीची आणि थंड होण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही एसीला थंड होण्यासाठी वेळ दिला नाही तर एसी जास्त गरम होऊ लागेल. जास्त गरम झाल्यामुळे कंप्रेसरमध्ये आग लागू शकते, त्यामुळे मोठा स्फोट होतो. तसेच एअर कंडिशनरचं देखील नुकसान होऊ शकतं, तुम्हाला दुखापत देखील होऊ शकते. उन्हाळ्यात एसीचा स्फोट झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. त्यामुळे वेळीच योग्य ती खबरदारी घ्या.