रेडिटवर नुकताच एका तरुणाने अनुभव शेअर केला. संपूर्ण सोशल मीडियावर त्याची मोठी चर्चा सुरु झाली. चर्चेला जोर मिळाला आणि नेटकऱ्यांनी आपली मते मांडायला सुरवात केली. विषयही तसाच होता. नव्या पिढीतील मुलांना नोकरी , कामाचा ताण सहन होत नाही असा विषय आजकाल सगळीकडे सुरु आहे. (A young man resigned within 3 hours of joining the job, after hearing the reason a huge discussion started on social media)त्यातच एका तरुणाने रेडीटवर असे सांगितले की त्याला नोकरी लागली होती मात्र त्याने ती अवघ्या ३ तासातच सोडली.
या तरुणाला मिळालेली नोकरी वर्क-फ्रॉम-होम होती. मुलाखतीदरम्यान त्याला कामावर कमीत कमी ताण असेल, दबाव नसेल, असा विश्वास दिला गेला होता. महिन्याचा पगार १२,००० रुपये असणार होता. पहिली नोकरी असल्यामुळे त्याला हे स्वीकारण्यासारखे वाटले. पण कामाच्या पहिल्याच दिवशी, त्यातही सुरुवातीच्या काही तासांत त्याला समजले की प्रत्यक्ष परिस्थिती सांगितल्यापेक्षा खूप वेगळी आहे. शिफ्ट पूर्ण नऊ तासांची होती आणि त्यातून फारशी कौशल्यविकासाची संधी मिळेल असेही दिसत नव्हते. इतक्या वेळ काम करुनही करिअरमध्ये वाढ होईल, शिकायला काही मिळेल किंवा नवीन संधी उपलब्ध होतील, असे काहीच त्याला जाणवत नव्हते. उलट ही नोकरी त्याला एका जागी स्थिर ठेवणार आहे, प्रगतीकडे जाणारा मार्ग बंद करणार आहे, असे त्याला वाटले. ९ तासाची शिफ्ट करणे ते ही एवढ्या कमी पगारावर काही जमणार नाही असे म्हणून त्याने पहिल्याच दिवशी नोकरी सोडली.
त्याची ही पोस्ट आणि निर्णय अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला. काहींनी त्याची भूमिका योग्य ठरवली, त्यांच्या मते कमी पगारात नऊ तास काम करणे योग्य नाही, विशेषतः जेव्हा त्या कामातून तुमचे कौशल्य वाढत नाही. वेळ, मेहनत आणि मानसिक ऊर्जा खर्च करुनसुद्धा जर त्याचा तुमच्या भविष्यात काहीच उपयोग होणार नसेल, तर अशी नोकरी करण्याला काही अर्थ राहत नाही, असे अनेकांचे मत होते. दुसरीकडे काहींनी सांगितले की पहिली नोकरी कशीही असली तरी ती टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते, कारण अनुभव मिळणे आवश्यक आहे. पहिल्या नोकरीत काम कठीण वाटणे, ताण जाणवणे किंवा थकवा येणे हे सामान्य असते आणि तो वेळेनुसार कमी होत जातो, असेही अनेकांनी सांगितले.
या घटनेचा एक भाग असा की, तरीही या सर्व चर्चांच्या पलीकडे एक मोठा मुद्दा पुढे आला तो म्हणजे आजची तरुण पिढी फक्त नोकरी मिळाली म्हणून ती स्वीकारत नाही, ते काम त्यांच्या कौशल्यात भर घालत आहे का, त्यातून भविष्यात प्रगतीची संधी मिळेल का, याकडे ते अधिक लक्ष देत आहेत. कमी पगार, जास्त तास आणि करिअरमध्ये फारशी वाढ नसलेले काम करणे आता अनेकांना स्वीकारार्ह नाही. ही पिढी कामाचा अर्थ, कामाची गुणवत्ता आणि स्वत:च्या भविष्यासाठी त्या कामाचा उपयोग याला जास्त महत्त्व देते.
दुसरीकडे कामाचा थोडाही ताण जर नवी पिढी सहन करु शकली नाही तर नोकरी कशी करु शकेल? तसेच कामाच्या पहिल्याच दिवशी नोकरी सोडणारा हा एकच तरुण नाही, मानसिक शांतता मिळणार नाही असे म्हणून अनेक तरुण नोकरी अनुभव घेण्याआधीच सोडतात. नव्या पिढीचे बदललेले वर्क कल्चर फायद्याचे का तोट्याचे हा प्रश्न आहेच. सोशल मिडियावरही हा मुद्दा चर्चेचा विषय आहे.
