ऑटो रिक्षा म्हणजे भारतातल्या बहुसंख्य लोकांची आवडीची सफारी. अवघ्या भारतात सगळीकडेच दिसणारी ही रिक्षा सदैव प्रवाशांच्या सेवेत तत्पर असते. बस, टॅक्सी अशा इतर प्रवासी वाहनांच्या तुलनेत ती आपल्याला जरा जास्त जवळची वाटते आणि तिच्यातला प्रवासही अधिक सोयीस्कर वाटतो. सामान्य भारतीयांच्या मनात घर करून बसलेली ही रिक्षा Louis Vuitton या जगप्रसिद्ध ब्रॅण्डलाही अतिशय आवडली असून आता या ब्रॅण्डने चक्क भारतीय ऑटो रिक्षाचं डिझाईन असणाऱ्या हॅण्ड बॅग तयार केल्या आहेत.(Auto Rickshaw Handbag by Louis Vuitton)
लुईस विटॉन या ब्रॅण्डने नुकतंच त्यांचं Spring/Summer 2026 menswear कलेक्शन लाँच केलं. यामध्ये भारतीय कला, इतिहास, संस्कृती याच्याशी संबंधित इतरही अनेक वस्तू होत्या. पण त्यापैकी सगळ्यात जास्त लक्षवेधी ठरली तर ऑटो रिक्षाचं डिझाईन असणारी हॅण्ड बॅग.
लेदर वापरून तयार करण्यात आलेली ही बॅग अतिशय आकर्षक असून पहिल्यांदा पाहिल्यास ती तुम्हाला लहान मुलांच्या एखाद्या खेळण्याप्रमाणेच वाटते. त्यानंतर मग हळूहळू तिच्यावर केलेलं बारीक काम लक्ष वेधून घेतं. या रिक्षाला छोटी छोटी चाकं असून एक नाजूक बेल्टही आहे.
पुरुषांसाठी असणाऱ्या या हॅण्डबॅगचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरही शेअर करण्यात आला असून तो अवघ्या काही तासांतच खूप व्हायरल झाला होता. या बॅगची किंमत तब्बल ३५ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतं.
आषाढी एकादशीचा उपवास केला, पण आता ॲसिडीटी वाढली- पोट बिघडलं? ४ उपाय करून पाहा
ही बॅग किती लोकप्रिय होत आहे हे व्हिडिओला मिळालेल्या कमेंटवरून दिसून येतं. ही बॅग पुरुषांसाठी बनविण्यात आलेली असली तरी कित्येक महिलाही ती घेण्यासाठी उत्सूक आहेत. लुईस विटॉनने ही बॅग तयार केल्यामुळे ती सध्या खूप महाग आहे. पण ती एखाद्या लोकल ब्रॅण्डने तयार केली तर ती माझ्या बजेटमध्ये असेल आणि अगदी लगेच मी ती घेऊन टाकेल, असंही अनेकांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे.