Join us
Daily Top 2Weekly Top 5

उपकारांची परतफेड! लहानपणी मायेनं सांभाळणाऱ्या नॅनीला भेटायला तो ३८ वर्षांनी आला आणि..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 16:46 IST

फ्रेंच व्यक्ती लहान असताना आपल्या वडिलांसोबत आयव्हरी कोस्टमध्ये राहत होता. याच दरम्यान एक नॅनी त्याची काळजी घेत असे.

एका फ्रेंच व्यक्तीने बालपणातील त्याच्या एका खास व्यक्तीला शोधण्यासाठी पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टसाठी प्रवास केल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. या व्यक्तीने तब्बल ३८ वर्षांनंतर त्याच्या नॅनीसाठी हा विशेष प्रवास केला आहे. लहानपणी नॅनीने काळजी घेतली होती म्हणून या व्यक्तीने आता तिला १० मिलीयन फ्रँक्स गिफ्ट म्हणून दिले आणि आयुष्यभर आधार देण्याचं वचन दिलं आहे. 

फ्रेंच व्यक्ती लहान असताना आपल्या वडिलांसोबत आयव्हरी कोस्टमध्ये राहत होता. याच दरम्यान एक नॅनी त्याची काळजी घेत असे. ती त्याला वेळेवर प्रेमाने खाऊ घालायची. त्याच्यासोबत खेळायची आणि आईप्रमाणे त्याची काळजी घ्यायची. त्यामुळे मुलालाही तिची खूप सवय झाली होती. तोही तिच्यावर खूप प्रेम करायचा.

लहानपणी केलेल्या प्रेमाबद्दल मानले आभार

काही वर्षांनी वडील नोकरीवरून निवृत्त झाले आणि कुटुंब फ्रान्सला परत गेलं. त्यानंतर नॅनीशी असलेला कॉन्टॅक्ट तुटला. कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी मोबाईल  किंवा सोशल मीडिया नव्हता. आता ३८ वर्षांनंतर या व्यक्तीला अजूनही त्याच्या नॅनीची आठवण येत होती. तो तिला शोधू इच्छित होता आणि लहानपणी केलेल्या सर्व प्रेमाबद्दल तिचे आभार मानू इच्छित होता. म्हणून त्याने तिला शोधण्यासाठी आयव्हरी कोस्टला परत जाण्याचा निर्णय घेतला.

डोळ्यात आले आनंदाश्रू

शोध घेतल्यानंतर फ्रेंच व्यक्तीला त्याची नॅनी सापडली. जेव्हा त्यांनी पुन्हा एकमेकांना पाहिलं तेव्हा ते खूप आनंदी आणि भावनिक झाले. त्यांनी घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. नॅनीचे मनापासून आभार मानण्यासाठी या व्यक्तीने १० मिलीयन फ्रँक्स गिफ्ट म्हणून दिले. नॅनी उर्वरित आयुष्य आरामात जगू शकेल म्हणून आणखीही मदत केली आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरल