घराची स्वच्छता अगदी रोजच्या रोज ठेवावीच लागते. नाहीतर घर खूप घाण होऊन जातं. अस्वच्छ, घाण घर असलं की त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावरच होतो. त्यामुळे घराच्या स्वच्छतेची तर आपण विशेष काळजी घेतोच, पण तरीही घरातल्या अशा काही जागा असतात ज्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग त्या जागांमधूनच वेगवेगळी इन्फेक्शन्स पसरतात आणि आजारपणं वाढतात. वरवर दिसायला चकाचक असलं म्हणजे तुमचं घर स्वच्छ आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. घर जर खरोखरच स्वच्छ करायचं असेल तर पुढे सांगितलेल्या तुमच्या घरातल्या काही जागा स्वच्छ आहेत का ते एकदा तपासून घ्या..
घर स्वच्छ असलं तरी घरातल्या 'या' जागा असतात खूप घाणेरड्या
१. मोबाईल फोनचे कव्हर, वेगवेगळे रिमोट कधीही स्वच्छ केले जात नाहीत. त्यांच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष द्यायला हवे.
२. सिंक, बेसिन आपण नियमितपणे स्वच्छ करताे. पण त्यांचे नळ बरेच दिवस स्वच्छ केले जात नाहीत. त्यांच्याद्वारे इन्फेक्शन पसरण्याचीही खूप शक्यता असते.
३. चॉपिंग बोर्ड वर वर स्वच्छ करून तो म्हणावा तसा स्वच्छ होत नाही. त्याच्यामध्ये खूप लहान भेगा असतात. त्यात भाज्यांचे कण, फळांचे कण अडकून बसतात. तो आठवड्यातून एकदा पुर्णपणे स्वच्छ होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तो गरम पाण्यात भिजत टाकून स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे.
४. भांडी घासण्याची घासणी कितपत स्वच्छ आहे हे एकदा तपासून पाहा. त्या घासणीमध्ये अन्नाचे कण अडकून पडतात. कुजतात, सडतात. त्यामुळे घासणीही स्वच्छ झाली पाहिजे. ती स्वच्छ होत नसेल तर टाकून देणं जास्त चांगलं.
५. किचन टॉवेलही कितपत स्वच्छ आहेत, याकडे एकदा लक्ष द्या.
६. लाईटचे बटन्स, पायपुसणी, टॉयलेट बाथरुमच्या दरवाज्याला असणारे हॅण्डल्स या वस्तूंची देखील स्वच्छता व्हायला हवी. ते देखील नियमितपणे सॅनिटाईज करणं खूप गरजेचं आहे.
