Join us

रस काढून लिंबू फेकू नका- डासांना पळवून लावण्यापासून ते घराच्या स्वच्छतेपर्यंत ५ कामांसाठी वापरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2024 18:36 IST

5 Amazing Ways To Reuse Squeezed Lemon: रस पिळून घेतला की लिंबाच्य साली आपण सरळ कचऱ्यात टाकतो. पण त्याच किती वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो पाहा...

ठळक मुद्दे सध्या लिंबू एवढे महाग झाले आहेत. त्यामुळे त्याच्या सालींचाही अतिशय योग्य प्रकारे वेगवेगळ्या कामांसाठी कशा पद्धतीने उपयोग करून घ्यायचा ते पाहा.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे लिंबू सरबत नेहमीच लागतं. तसंही एरवी आपण लिंबू स्वयंपाकात वापरतोच. लिंबाचा रस काढतो आणि त्याच्या सालींचा काय उपयोग म्हणून त्या टाकून देतो. पण त्या सालींचेही खूप वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करता येतात. त्यातच सध्या लिंबू एवढे महाग झाले आहेत. त्यामुळे त्याच्या सालींचाही अतिशय योग्य प्रकारे वेगवेगळ्या कामांसाठी कशा पद्धतीने उपयोग करून घ्यायचा ते पाहा. (how to reuse squeezed lemon)

लिंबाच्या सालांचा कसा वापर करावा?

 

१. लेमन झेस्ट

लिंबू पिळून झालं की त्याचं साल किसून घ्या किंवा मिक्सरमधून हलकेच फिरवून घ्या. त्यानंतर हे मिश्रण उन्हामध्ये वाळवा. छानपैकी लेमन झेस्ट तयार होईल. वेगवेगळ्या रेसिपींमध्ये, सरबतांमध्ये लेमन झेस्ट टाकलं तर पदार्थाची चव आणखी वाढते.

२. स्टीलच्या नळांची स्वच्छता

 लिंबाच्या सालींवर थोडा बेकिंग साेडा, थोडं लिक्विड डिशवॉश टाका आणि त्याने स्टीलचे नळ घासून काढा. पटापट स्वच्छता होईल आणि नळ अगदी नव्यासारखे चमकतील.

 

३. हाताचे कोपरे, घोटे, गुडघ्यांची स्वच्छता

लिंबाच्या सालींवर थोडी कॉफी पावडर टाका आणि त्याने हाताचे काळवंडलेले कोपरे, पायाचे घोटे, मान, गुडघे हे भाग घासून काढा. त्या भागांवरचा काळा थर बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

४. डासांना पळवून लावण्यासाठी

लिंबू मधोमध कापलं तर त्याचे दोन वाट्यांसारखे भाग होतात. त्यामध्ये थोडं तेल, लवंग, कापूर पावडर टाका आणि त्यात एखादी फुलवात टाका. हा दिवा घरात लावल्यास घर सुगंधी तर होईलच पण घरातून डास, माशा, चिलटंही पळून जातील. 

 

५. फर्निचरची स्वच्छता

लिंबाच्या साली एका भांड्यात घ्या. त्यात थोडं पाणी, व्हिनेगर, लिक्विड डिशवॉश आणि बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. घरातलं फर्निचर, काचा, दरवाजे पुसण्यासाठी हे मिश्रण खूप उपयोगी ठरेल. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सकिचन टिप्सहोम रेमेडी