Hair Dye Side Effects : आजकाल सगळ्यांनाच सेलिब्रिटींसारखा लूक हवा असतो. मग त्यासाठी वेगवेगळ्या उपचार घेतात किंवा केमिकल्सचा वापर करतात. या गोष्टी त्वचा सतेज करण्यासाठी किंवा केस मुलायम वा चमकदार करण्यासाठी केल्या जातात. पण असं करणं किती महागात पडू शकतं हे दाखवणारी एक घटना समोर आली आहे. चीनमध्ये एका 20 वर्षीय तरूणीसोबत असं काही घडलं की, तिला किडनीसंबंधी आजार झाला. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींसारखं दिसणं तिला चांगलंच महागात पडलं.
HUA नावाची ही तरूणी दर महिन्यात तिच्या आवडत्या सेलिब्रिटींसारखी केसांना कलर करायला सलूनमध्ये जात होती. पण काही दिवसांनी तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या आणि जॉइंट्समध्येही वेदना होऊ लागल्या. पायांवर लाल चट्टे दिसू लागले होते. जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली आणि टेस्ट केल्या तर समजलं की, तिच्या किडनीवर सूज आहे, ज्याला किडनी इन्फ्लेमेशन म्हटलं जातं.
झेंगझोउ पिपल्स हॉस्पिटलचे डॉक्टर ताओ चेनीयांग यांनी सांगितलं की, बऱ्याच केस कलर करताना डोक्याच्या त्वचेच्या माध्यमातून शरीरात विषारी तत्व जमा होतात. जे फुप्फुसं आणि किडनीचं नुकसान करतात. इतकंच नाही तर कॅन्सरचा धोकाही वाढवतात. बाजारात असे अनेक कलर मिळतात, ज्यात सीशाचं आणि पाऱ्याचं प्रमाण अधिक असतं. जे घातक तत्व असतात.
याआधीही घडल्या अशा घटना
अमेरिकेत हेअरस्टायलिस्ट हेक्टर कोर्वेरानं 2025 च्या सुरूवातीलाच 10 कंपन्यांवर लॉस एंजलिसमध्ये केस दाखल केली होती. त्यांचा दावा होता की, त्यांना ब्लॅडर कॅन्सर झाला आहे, कारण ते हेअर डायमध्ये असलेल्या कार्सिनोजेनिक केमिकल्सच्या संपर्कात आले. जेव्हा डॉक्टरांनी त्यांना आपण काय काम करता विचारले तेव्हा त्यानी हेअर स्टायलिस्ट असल्याचं सांगितलं. तेव्हा डॉक्टरांनी हेअर कलरकडेच इशारा केला होता.
हेअर डाय किंवा कलर करताना काय काळजी घ्यावी?
अॅलर्जी टेस्ट करा
डाय लावण्याआधी 24 तासांपूर्वी पॅच टेस्ट करा. थोडासा कलर हाताच्या मागील बाजूस किंवा कानामागे लावा.जर खाज, लालसरपणा किंवा जळजळ झाली तर तो कलर वापरू नका.
केस आणि टाळू स्वच्छ पण कोरडे ठेवा
कलर लावण्यापूर्वी केसांवर जास्त तेल, धूळ किंवा प्रॉडक्ट्स नसावेत. पण शॅम्पूनंतर लगेच कलर करू नका कारण त्या वेळी टाळू संवेदनशील असतो.
हातमोजे वापरा
केमिकल्स थेट हातावर लागू देऊ नका. हात काळे पडू नयेत आणि त्वचेचं नुकसान टळावं म्हणून ग्लोव्हज वापरणं आवश्यक आहे.
जास्त वेळ ठेवू नका
डाय पॅकवर दिलेल्या वेळेइतकाच ठेवा. जास्त वेळ ठेवल्यास केस कोरडे, राठ आणि तुटक होतात.
थंड किंवा कोमट पाण्याने धुवा
गरम पाणी वापरू नका त्याने रंग लवकर निघतो आणि केस कोरडे होतात.
कलरनंतर डीप कंडिशनिंग करा
डाय केल्यानंतर केसांना पोषण देण्यासाठी डीप कंडिशनर किंवा हेअर मास्क वापरा.
त्याने केस मऊ, चमकदार आणि मजबूत राहतात.
सूर्यप्रकाश आणि क्लोरिनपासून बचाव
रंग केलेले केस UV किरणे आणि स्विमिंग पूलमधील क्लोरिनमुळे फिक्कट होतात. बाहेर जाताना स्कार्फ किंवा कॅप वापरा.
वारंवार कलर करू नका
दर महिन्याला केस रंगवल्यास त्यातील केमिकल्स केसांची गुणवत्ता खराब करतात. किमान 6 ते 8 आठवड्यांचं अंतर ठेवा.
नैसर्गिक पर्यायांचा विचार करा
केमिकल डायऐवजी मेंदी, कॉफी, बीट, इंडिगो पावडर असे नैसर्गिक पर्याय वापरून पहा.