जवळपास सगळेच टपरवेअरचे डबे आणि बाटली वापरतात. त्यातून जेवण बाहेर येत नाही, बाटली गळत नाही तसेच पडल्यावर किंवा आपटल्यावर लगेच खराबही होत नाहीत. घरात जेवण साठवण्यासाठी, डबा पॅक करण्यासाठी किंवा पाणी ठेवण्यासाठी टपरवेअरचे डबे आणि बाटल्या आज प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतात. (1 trick to clean Tupperware plastic containers and bottles, oily stains will be removed and smell also)हे डबे टिकाऊ, हलके आणि आकर्षक असले तरी त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांची क्वालिटी कमी होते, रंग फिकट होतो आणि त्याला विचित्र वास यायला लागतो. पदार्थांचे तेल बाहेर येते आणि दर्जा खराब होतो. त्यामुळे हे डबे जास्त दिवस टिकावेत यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
टपरवेअरचे डबे आणि बाटल्या वापरुन झाल्यावर लगेच धुवावेत. तेलकट पदार्थ ठेवल्यानंतर उशीराने धुतल्यास डब्याच्या आत तेलाचा थर साचतो आणि दुर्गंधी येते. डबे धुताना सौम्य डिशवॉश लिक्विड आणि कोमट पाणी वापरा. खूप खडबडीत स्क्रबर वापरु नका, कारण त्यामुळे डब्यांच्या पृष्ठभागावर ओरखडे पडतात. तसेच डबे खराब दिसतात. गरम पदार्थ थेट टपरवेअरच्या डब्यात टाकू नयेत. थोडे गार झाल्यानंतरच पदार्थ भरावेत, कारण गरम वाफेमुळे प्लॅस्टिक मऊ होते आणि त्याचा टिकाऊपणा कमी होतो. झाकणाचा आकार बदलतो आणि मग पदार्थ बाहेर येतात. तसेच फ्रीजमध्ये ठेवताना झाकण घट्ट लावून ठेवा, त्यामुळे वास आत जात नाही आणि अन्न ताजं राहते.
बाटल्यांची स्वच्छता करताना त्यात आठवड्यातून एकदा थोडं बेकिंग सोडा आणि कोमट पाणी टाकून हलवावं, त्यामुळे आत साचलेला वास आणि डाग निघून जातात. बाटली उन्हात ठेवून कोरडी केल्यास ताजेपणा टिकतो. या बाटल्या फार चांगल्या असल्या तरी त्यात पाणी सोडून इतर पदार्थ साठवू नयेत. बाटलीच्या मटेरियलमधील घटक पदार्थांत उतरतात. तसेच त्यात गरम पाणी भरणे टाळा. साधे पाणी किंवा गार पाणी भरण्यासाठीच तिचा वापर करा.
टपरवेअर डबे मायक्रोवेव्हमध्ये वापरताना ‘मायक्रोवेव्ह सेफ’ चिन्ह असलेलेच डबे वापरा. झाकण घट्ट लावून गरम करू नका, कारण दाब निर्माण होऊन झाकण वाकू शकते.
टपरवेअरचे डबे थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका, कारण त्यामुळे रंग बदलतो आणि प्लॅस्टिक कमकुवत होते. योग्य साफसफाई, योग्य तापमान आणि योग्य साठवणूक यामुळे हे डबे अनेक वर्षे नवेच राहतात आणि त्यांच्या क्वालिटीवर परिणाम होत नाही.
