जयशंकर महाले
ऑनलाइन शॉपिंग. हवं ते हवं तेव्हा मिळतं, आपल्या इच्छेनं घेता येतं. आणि पर्याय हजारो. रिव्ह्यू वाचताही येतात आणि आपल्या बजेटप्रमाणे, नव्या स्टाइलप्रमाणे हवे ते मिळते. त्यामुळे आपण आजकाल सर्रास ऑनलाइन शॉपिंग करतो. लोक दोन मिनिटांत डिलिव्हरी करणाऱ्या ॲपवरुन सोनं चांदीही मागवायला लागले आहेत तिथे कपडे आणि गृहपयोगी वस्तूच्या ऑनलाइन शॉपिंगचे नाविन्य कुणालाही उरलेले नाही. मनात येईल ते आपण ऑनलाइ खरेदी करु शकतो. ई-कॉमर्स हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय झालेला आहे. सणासुदीच्या काळात देण्याततर ऑनलाइन बंपर ऑफर्स असतात. धमाका सेल, स्वस्त सेल अशी बरीच प्रलोभनंही असतात. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करण्यात गैर काहीच नाही पण आपणच आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यायलाच हवी. नाहीतर काही समजायच्या आत आपली फसवणूक अटळच आहे.
काळजी काय घ्याल?
१. मार्केटमध्ये दुकानात एखाद्या वस्तूची शॉपिंग करताना आपल्याला प्रत्यक्ष वस्तू पाहता येते. ऑनलाइन शॉपिंग करताना त्या वस्तूचा फोटो दिसतो. प्रत्यक्षातलं कापड, रंग, गुणवत्ता ही फोटोत दिसते त्याहून कमअस्सल असूच शकते.
२. कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय स्वीकारा. अनेकदा क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी करताना काळजी घेतली नाही तर पैसे जाऊनही हवी ती वस्तू मिळेलच याची खात्री नाही.
३. सुरक्षित, नेहमीच्या साइट्स निवडा. अनेक सायबर ट्रॅप असे असतात की सुरक्षित दिसते पण पैसे गेले की ती साईटच गायब होऊन जाते.
४. ऑनलाइन खरेदी करताना रिव्हयू वाचा, शंका आलीच तर मुळीच वस्तू घेऊ नका.
५. महागडी खरेदी करताना हजारवेळा खात्री करा, विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करत असाल तर पूर्ण खात्री असल्याशिवाय ऑनलाइन घेऊ नका.
६. रिटर्न, रिफंड पॉलिसी नेमकी काय आहे, हे तपासा. खात्री करा. आणि तरच ऑनलाइन विकत घ्या.
७. संपूर्ण खात्री झाल्याशिवाय ऑनलाइन खरेदी अजिबात करु नका.