lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक..

women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक..

Women's Day special: महिला दिनाची चर्चा करताना महिलांचे मूलभूत मानवी प्रश्नही चर्चेच्या केंद्रस्थानी येतील अशी अपेक्षा आणि आशा तरी करू...

By meghana.dhoke | Published: March 7, 2023 04:16 PM2023-03-07T16:16:14+5:302023-03-07T16:49:50+5:30

Women's Day special: महिला दिनाची चर्चा करताना महिलांचे मूलभूत मानवी प्रश्नही चर्चेच्या केंद्रस्थानी येतील अशी अपेक्षा आणि आशा तरी करू...

Women's Day special: glorification of women's sacrifice and need of child care help & support systems. | women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक..

women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक..

Highlights यशस्वी महिलेला टिपिकल प्रश्न विचारला जातो की घर-कुटुंब सांभाळून तुम्ही उत्तम व्यावसायिक यश कसे मिळवले?

मेघना ढोके, (संपादक, लोकमत सखी डिजिटल)

आधी नोकरी द्या, मग सुविधा द्या, अपेक्षा वाढतच चालल्या बायकांच्या! असं कुणी उघड बोलत नसलं तरी तरुण, प्रजननक्षम वयातल्या नोकरदार महिलांना अनेकदा आडूनआडून हे ऐकवले जातेच. त्यातही सर्वात मोठा प्रश्न असतो मूल झाल्यानंतर पुन्हा नोकरीवर रुजू होताना, आता मूल सांभाळणार कोण? बदलत्या कौटुंबिक व्यवस्थांमध्ये आजी-आजोबांवर उतरत्या वयात बाळ सांभाळण्याची जबाबदारी टाकणे हे त्यांच्यासाठीही अन्याय्य मानले जाते. मग महत्त्वाचा प्रश्न मूल सांभाळणार कोण? त्यातही प्रत्येकीला नोकरी सोडून घरी बसणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं, दुसरं आपलं उत्तम चाललेलं करिअर केवळ बालसंगोपनासाठी सोडून द्यायचं नसतं. मात्र आजही अनेकींना मनाविरुद्ध अशी निवड करावी लागते. कोरोनाच्या जागतिक संकटांचा सर्वात जास्त फटका नोकरदार मातांना बसला. अमेरिकेसह युरोपात प्रत्येकी ३ पैकी दोघींना नोकरी सोडावी लागली असं आजवरचे अभ्यास सांगतात. आता परिस्थिती निवळल्यावर त्यापैकी अनेकजणी नव्या कामाच्या संधी शोधत आहेत. कोरोनाकाळात नोकरी सोडण्याचं कारण काय होतं यासंदर्भातले अभ्यास सांगतात मुख्य कारण एकच होतं, मुलांना सांभाळण्याची सोय नव्हती. लॉकडाउनमध्ये सगळं जग घरात बंद झालेलं असताना मूल सांभाळून नोकरी करणं शक्य नसल्यानं (वर्क फ्रॉम होम असूनही) अनेकींना नोकऱ्या सोडाव्या लागल्या.
हे झालं कोरोनातलं एक उदाहरण. मात्र भवताली पाहिलं तरी नोकरदार महिलांसह बाळांसाठी ‘सपोर्ट सिस्टिम’च नसणं, पाळणाघरांसारख्या मूलभूत सोयी नसणं, कामाच्या ठिकाणी किंवा जवळ बाळ सांभाळण्याची सोय नसणं हे प्रश्न गंभीर आहेतच.
आणि त्याविषयी बोललं की एक प्रश्न समोर येतोच की, आजवर बायकांनी नोकऱ्या करून सांभाळलीच ना मुलं आणि घर आताच या नव्या (अतिरेकी) मागण्या कशासाठी?

(Image : google)

आपल्याला घराबाहेर पडून काम करता येतं, चार पैसे कमावून आर्थिक स्वातंत्र्य मिळतं आहे हेच ज्या काळात महिलांसाठी फार होतं, अनेक ठिकाणच्या पुरुषी व्यवस्थांमध्ये शिरकाव करून स्वत:ला सिद्ध करणं हीच फार मोठी गोष्ट होती तिथं काही मागणं किंवा आपली गैरसोय सांगणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं. त्यामुळे व्यावसायिक आणि कौटुंबिक व्यवस्थांमध्ये त्या स्त्रिया उरस्फोड करत धावत राहिल्या.
मात्र नव्या ‘जेंडर सेन्सिटिव आणि सेन्सिबल’ काळात महिलांना बालसंगोपनासाठी मूलभूत सोयीसुविधा मिळणं किंवा त्यांनी त्या मागणं हे ‘अवास्तव’ अजिबात म्हणता येणार नाही. मूल सांभाळणं हे एकट्या स्त्रीची नाही तर कुटुंबाची आणि पर्यायानं साऱ्या समाजाची जबाबदारी आहे. त्या साऱ्याचा भार एकट्या महिलेवर ढकलत तिलाच त्याग करायला सांगणं आणि त्या त्यागाभोवती उदात्त शब्दांचे इमले बांधणं तर योग्य नव्हेच.
त्याऐवजी नव्या सपोर्ट सिस्टिम उभ्या करणं, महिलापूरक कार्यालयीन व्यवस्था असणं, मातृत्व आणि संगोपन रजा, हिरकणी कक्ष, स्तनपान कक्ष, पाळणाघरं, स्वच्छतागृह असणं या आवश्यक गोष्टी आहेत. खरंतर या मूलभूत गोष्टींची मागणी करण्याची वेळच महिलांवर येऊ नये. आणि प्रसंगी त्यांनी मागणी केलीच तर काहीतरी ‘ड्रामे’ करतात असं लेबल लावून मूळ प्रश्नाकडेच कानाडोळा होऊ नये.

(Image : google)

मूळ प्रश्न आहे सपोर्ट सिस्टिम अर्थात आधार व्यवस्थांचा आणि त्यांच्या योग्य अंमलबजावणीचा.
ते सारं होत नाही आणि मग प्रत्येक महिला दिनाला यशस्वी महिलेला टिपिकल प्रश्न विचारला जातो की घर-कुटुंब सांभाळून तुम्ही उत्तम व्यावसायिक यश कसे मिळवले? या प्रश्नाचं खरं उत्तर असतं - दमछाक. मात्र ते सहसा महिला देत नाहीत.
तेच मूलभूत सोयीसुविधांच्या प्रश्नांचंही होतं.
महिला दिनाची चर्चा करताना महिलांचे मूलभूत मानवी प्रश्नही चर्चेच्या केंद्रस्थानी येतील अशी अपेक्षा आणि आशा तरी करू...


meghana.dhoke@lokmat.com

Web Title: Women's Day special: glorification of women's sacrifice and need of child care help & support systems.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.