-अर्चना यादव
कोरियन मालिकांची, कोरियन सौंदर्य उपचारांची क्रेझ आपल्याकडे काही कमी नाही. अनेकांना कोरियन मालिका आवडतात. कोरियन पदार्थ घरी करून खाल्ले जातात. अगदी गावखेड्यातही आपल्याकडे रेडी टू इट कोरियन पाकिटं मिळायला लागली. मात्र सध्या कोरियन महिलांविषयीची एक माहिती जगभरात, विशेषत: दक्षिण आशियात काळजीचा आणि व्हायरल ट्रेंडचा विषय ठरली आहे. मिहोन आणि बिहोन अशी ही चर्चा आहे. (women rejecting marriage)
मिहोन म्हणजे ढोबळ मानानं अर्थ सांगायचा तर ‘लग्न न झालेली’ किंवा ‘अजून तरी नाही लग्न केलेलं’ अशी तरुणी. म्हणजे अजून नाही ठरलं पण ठरेल लवकर, चालू आहेत प्रयत्न असं सांगायची रीत. कुटुंबव्यवस्था महत्त्वाची असलेल्या या देशातही मुलींची लग्न वेळच्या वेळी होणं पालकांना गरजेचं वाटतं. मुलीचं लग्न झालं की काळजी मिटली असाच एकूण रिवाज. पण २०२४ चा एक कोरियन अभ्यास सांगतो की तिथल्या सुमारे ६९ टक्के तरुणी असं आता जाहीर सांगतात की लग्न वाटलं तर करू, कुणी आवडलं तर करू, पण केलंच नाही लग्न म्हणजे बाईचं काही खरं नाही असं काही नाही. आम्ही आमच्या पायावर उभ्या आहोत, त्यामुळे लग्नाशिवाय एकटं राहिलं तर काही फार मोठा अपराध नाही.
त्यातून एक शब्द पुढं आला. ‘बिहोन!’
म्हणजे आपण लग्न केलेलं नाही, एकट्या आहोत, एकटं राहणार आहोत आनंदानं असं वाटणाऱ्या काही जणींनी एकत्र येत आपल्या सिंगल लाइफचं सेलिब्रेशन केलं. त्याचं नाव बिहोन. त्यावरूनही चर्चा झालीच की असं हे सेलिब्रेशन करून जगाला सांगायची काय गरज आहे लग्न न करण्याबद्दल!
तर त्याविषयी सोशल मीडियातल्या काही पोस्ट सांगतात की लग्न केलं नाही किंवा जमलंच नाही म्हणजे मुलीतच काहीतरी कमी आहे. किंवा ती सुंदर नाही, तिला कुणी पसंतच केलं नाही, तिचं एकटेपण गरीब बिचारं आहे असं मानलं जातं. लोक एकट्या बाईला कमी लेखतात.
पण आता मुली एकटं राहण्याचा किंवा मनासारखा जोडीदार मिळेपर्यंत एकटं राहण्याचा निर्णय स्वच्छेनं घेतात. केवळ आर्थिक अवलंबित्व म्हणून जोडीदार शोधण्यापेक्षा, संसार सुखानं करता येईल असा जोडीदार शोधत आहेत. आणि तोवर मी लग्न करणार नाही असं म्हणत आहेत. त्यामुळे आमच्याकडे बिच्चारी किंवा एकटी पाहू नका असं या मुलींना म्हणायचं आहे. आणि त्यातहून मिहोन-बिहोन असा एक मोठा सामाजिक वाद आणि चर्चा सुरू झाली.
त्यातून महिलांना दूषणंही दिली जात आहेत की यामुळे कुटुंब व्यवस्थांचं कसं होणार? सामाजिक स्वास्थ्याचं काय? ते वाद तिकडे सुरूच राहणार आहेत.
मात्र हे नक्की की कोरिया हा काही एकमेव देश या टप्प्यातून जात नाही. जगभरातच महिलांचे लग्न करण्याचे किंवा मूल जन्माला घालण्याचे प्रमाण कमी होत आहे असं अनेक देशातले अभ्यास सांगत आहेत. कॅनडासह रशियात हे प्रमाण मोठे आहे. युरोपियन देशातही एकेकट्या राहणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढते आहे. त्याच्या कारणांचे अभ्यास होत आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासह जुन्या पुरुषी पद्धतींना नकार अशी कारणं ढोबळमानानं सांगितले जातात. मात्र तो अधिक व्यापक अभ्यास आणि सामाजिक संशोधनांचा विषय आहे हे नक्की!
महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन हे नवे प्रश्न सुटणार नाहीत हे नक्की!
२०२६ आता उजाडलं आहे.
मात्र २०२४ मध्ये प्रसिद्ध झालेलं एक संशोधन सांगतं की २०३० मध्ये त्यावेळी २५ ते ४४ वयोगटात असलेल्या ४५ % महिला एकट्या असतील, लग्न नाकारतील. मूल नको म्हणतील. स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड या देशात तर आजच एकल महिलांचे प्रमाण मोठे आहे. लग्न नको, मूल नको असं म्हणत या महिला आपली जबाबदारी नाकारत ‘स्व-तंत्र’ जगण्यासाठी एकटं राहणं पत्करत आहेत असे आरोप त्यांच्यावर आजच होत असले तरी हा बदल आपल्या अवतीभोवती घडतो आहे, हे नाकारून चालणार नाही.
