Join us  

Whatsapp Web scan : जोडीदार चोरून वाचतात एकमेकांचे व्हाटसॲप मेसेज, प्रायव्हसी संपली, नात्यात भूकंप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:44 PM

मोबाईल नावाच्या खेळण्याचा खुळखुळाट एवढा वाढला आहे, की त्याच्या नादापायी आता अनेक नाती भातुकलीच्या खेळाप्रमाणे संपत चालली आहेत. व्हॉट्सॲप वेब स्कॅनिंग हा अशातलाच एक प्रकार. यामुळे तर थेट प्रायव्हसीवरच गदा आल्याने अनेक संसार सरळ काडीमोड करण्याकडे वाटचाल करत आहेत.

ठळक मुद्देएकमेकांवर संशय घेण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. आपला जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ नाही, असा संशय कायम काही जणांच्या मनात असतो. त्यातून हे असे प्रयोग होतात.

कोणतेही तंत्रज्ञान आले तरी सगळ्यात आधी त्या तंत्रज्ञानाचा दुरूपयोग कसा करता येईल, यासाठी काही अतिहुशार डोकी कायम सतर्क असतात. व्हॉट्सॲप वेब स्कॅन करणे हे असेच एक तंत्रज्ञान. व्हॉट्सॲप वेब स्कॅनिंग तंत्रज्ञानामुळे अवघ्या काही सेकंदांमध्ये आपल्या मोबाईलचे व्हॉट्सॲप कोणत्याही कम्प्युटर किंवा लॅपटॉपसोबत जोडले जाऊ शकते. यामुळे कनेक्ट केलेल्या कोणत्याही कम्प्युटरवर आपण आपल्याला आलेले व्हॉट्सॲप मेसेज वाचू शकतो. या तंत्रज्ञानाचा दुरूपयोग काही जोडप्यांकडून केला जात असून आता या माध्यमातून ते एकमेकांवर नजर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

जोडीदाराबद्दल ओव्हर पझेसिव्ह असणे, जोडीदाराचे कुणासोबत तरी अफेअर सुरू असल्याचा दाट संशय असणे, उगाचच एकमेकांवर बारीक लक्ष ठेवणे किंवा काही गोष्टी थेट विचारता येत नसल्याने असे आडवळणाने, चोरवाटेने जोडीदाराची जासूसी करणे, यासाठी आता अनेक जणं व्हॉट्सॲप वेब वापरत आहेत. 

 

व्हॉट्सॲप वेबद्वारे एकदा का जोडीदाराचे व्हॉट्सॲप आपल्या लॅपटॉपसोबत कनेक्ट केले, की मग जोडीदाराचा मोबाईल आपल्या आसपास नसला, तरी काही अडत नाही. शिवाय जोपर्यंत आपण लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर कनेक्ट झालेले व्हॉट्सॲप लॉगआऊट करत नाही, तोपर्यंत आपल्याला कनेक्ट केलेल्या वॉट्सॲपचे मेसेज अगदी बिनधास्तपणे वाचता येतात. त्यामुळे जोडीदार आणि त्याचा मोबाईल कुठेही असला तरी आपला जोडीदार व्हॉट्सॲपद्वारे कुणाशी काय चॅटींग करतो, किती वेळा बोलतो, कोणाला कोणते इमोजी पाठवतो, यावर अगदी बारीक नजर ठेवता येते. 

या तंत्रज्ञानाचा आणखी एक फायदा म्हणजे ज्याचा मोबाईल आपण आपल्या लॅपटॉपशी कनेक्ट केला आहे, त्याला याबाबत काहीही कळत नाही. म्हणजे जसे आपण फोन चार्जिंग लावला असताना किंवा वायफाय सुरू असताना माेबाईलवर विशिष्ट चिन्ह येते, तशा प्रकारची कोणतीही सूचना व्हॉट्सॲप वेबद्वारे मिळत नाही. त्यामुळे आपले मेसेजेस कुणी चोरून वाचते आहे, हे लक्षात येण्यासही काही वाव नसतो.

 

यामुळेच अनेक कंपन्यांनी व्हॉट्सॲप वेब स्कॅनिंगवर बंदी घातली आहे. कारण यातून नात्यांमध्ये जसा दुरावा येऊ शकतो, तसेच व्यावसायिक स्तरावर मोठी हानी देखील होऊ शकते. हा एक प्रकारे मोबाईलचे व्हॉट्सॲप हॅक करण्याचाच प्रकार आहे.

तज्ज्ञ सांगतात...

एकमेकांवर संशय घेण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. आपला जोडीदार आपल्याशी एकनिष्ठ नाही, असा संशय कायम काही जणांच्या मनात असतो. त्यातून हे असे प्रयोग होतात आणि मग नाते कधी संपून जाते, ते ही बऱ्याच जोडप्यांना कळत नाही. घटस्फोटासाठी जर १०० प्रकरणं येत असतील, तर त्यातील ३५ ते ४० प्रकरणं ही मोबाईलमुळे होणाऱ्या वादातून आलेली असतात. एवढे या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे.

- ॲड. सुस्मिता दौंड, समुपदेशक

 

टॅग्स :रिलेशनशिपमोबाइलघटस्फोट