lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > काय तुझ्या मनात..?- काय हवंय ते नेमकं सांगत का नाहीस?- असं म्हणत नवरे का वैतागतात?

काय तुझ्या मनात..?- काय हवंय ते नेमकं सांगत का नाहीस?- असं म्हणत नवरे का वैतागतात?

बायकोच्या मनात काय चाललंय हे कळूच शकत नाही!- हे खरं की नवऱ्यानं मारलेली थाप? एरव्ही सगळं समजणाऱ्या नवऱ्याला बायकोच्या अपेक्षा का समजू नयेत? नेमकं कुठं आणि काय चुकतं की दडवलं जातं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:07 PM2021-09-14T16:07:39+5:302021-09-14T16:19:45+5:30

बायकोच्या मनात काय चाललंय हे कळूच शकत नाही!- हे खरं की नवऱ्यानं मारलेली थाप? एरव्ही सगळं समजणाऱ्या नवऱ्याला बायकोच्या अपेक्षा का समजू नयेत? नेमकं कुठं आणि काय चुकतं की दडवलं जातं?

what exactly wife wants? unable to understand or men just don't give attention to expectations | काय तुझ्या मनात..?- काय हवंय ते नेमकं सांगत का नाहीस?- असं म्हणत नवरे का वैतागतात?

काय तुझ्या मनात..?- काय हवंय ते नेमकं सांगत का नाहीस?- असं म्हणत नवरे का वैतागतात?

Highlightsबायकांच्या साध्या साध्या अपेक्षा पुरुष माणसांना का समजत नाहीत? याचं उत्तर फार जिव्हारी लागणारं आहे...

गौरी पटवर्धन

पुरुष ऑलमोस्ट कधीच “आमच्या मनातलं ओळखा’ असा खेळ खेळतांना दिसत नाहीत. कारण त्यांच्या मनात काय असतं याचा विचार करण्याचं आणि त्याप्रमाणे वागण्याचं बायकांना लहानपणापासून ट्रेनिंग दिलेलं असतं. नवरा ऑफिसमधून आल्यावर त्याला गरम चहाचा कप हवा असेल हे घरातली बाई आपोआप ओळखते. किती नवऱ्यांना रोज घरी आल्यावर बायकोला हे सांगावं लागतं की मला आयता चहा प्यावासा वाटतो आहे तर तो तू कर. कोणालाच सांगावं लागत नाही. एवढंच नाही, तर बाहेर पाऊस पडत असेल किंवा गारठा असेल तर बायको “आपोआप” चहात आलं घालते. नवऱ्याला तिला हे सांगावं लागत नाही की “आज माझ्या मनात असं आहे की बायकोने आपल्याला आल्याचा चहा द्यावा.” पण हेच जर का नवरा आधी घरी आला असेल आणि बायको बाहेरून दमून किंवा भिजून घरी आली असेल तर तिलाही आयता चहा प्यावासा वाटतो. तिच्याही हे मनात येतं, की “मी कपडे बदलून फ्रेश होऊन येईपर्यंत नवऱ्याने जर का आपल्यासाठी आयता चहा केला तर किती छान होईल…”
पण किती नवऱ्यांना ते “आपोआप” कळतं?

दोघं नोकरी करणारे असतील तर संपूर्ण आठवड्यात घर आवरणे या प्रकाराला वेळच मिळालेला नसतो. त्यात रविवारची सुट्टी साधून कोणी पाहुणे येणार असतात. अश्या वेळी बायकोने उठून स्वयंपाक केला पाहिजे असं नवऱ्याच्या मनात असतं आणि ते बायकोला आपोआप समजतं. घर आवरलं गेलं पाहिजे, हॉलमधल्या दिवाणावरची चादर बदलली गेली पाहिजे असंही बरंच काय काय नवऱ्याच्या मनात असतं. ते बायकोला आपोआप कळतं का? तर बहुतेक वेळा कळतं. कारण घर आवरलेलं नसेल तर लोक तिलाच नावं ठेवणार असतात. 
पण ते आवराआवरी करण्याचं काम नवऱ्याने करावं असं तिच्या मनात असतं. ते त्याला कळतं का?
आणि कळलं तरी तो ते कळल्याचं दाखवतो का? का भामट्यासारखा गप्प बसून राहतो?
बरं यावर एक आर्ग्युमेंट असं असतं, की समजा नवऱ्याच्या मनातली एखादी गोष्ट बायकोला समजली नाही तर तो काय करतो? तर स्पष्ट सांगतो.
 बऱ्याच वेळा त्याला “एवढं साधं समजत नाही का तुला?” याचा तडकाही मारतो. 
मग बायको तेच का करत नाही? स्पष्ट का सांगत नाही? तर आपल्या अपेक्षा स्पष्ट बोलून दाखवण्याचे संस्कार आपल्याकडे मुलींवर केले जात नाहीत. ज्या मुली आपल्या अपेक्षा स्पष्ट बोलून दाखवतात त्यांच्यावर ‘आगाऊ’ असल्याचा शिक्का ताबडतोब मारला जातो.
शिवाय माणूस एखादी गोष्ट केव्हा सांगतो? जेव्हा त्याला असं वाटत असतं की समोरच्याला खरंच समजत नाहीये. पण जेव्हा त्याच्या हे लक्षात येतं की समोरच्या समजून घ्यायचंच नाहीये तेव्हा त्याने समजावून सांगण्याची शक्यताही कमी कमी होत जाते. आणि मनातल्या मनात कुढत धुसफूस करण्याची शक्यता वाढत जाते.
पण समजा… तरीही… आपल्या ‘मनात’ नेमकं काय आहे हे बायकांनी सांगायला नेमकी काय हरकत आहे?

आपल्या मनातलं समोरच्याने ओळखावं असं बायका म्हणतात तेव्हा बहुतेक वेळा त्या गोष्टी अशा असतात की त्या बायकांचा थोडासा विचार आपण केला तर त्या सहज समजू शकतात.
“मैत्रिणीबरोबर बाहेर गेलेली असतांना अमुक दुकानात दिसलेली तमुक साडी मला आवडली होती, ती मी न सांगता नवऱ्याने बरोब्बर ओळखावी आणि आणून द्यावी.’ असल्या अशक्य अपेक्षा बायकांच्या बहुदा नसतात. अर्थात असल्या अपेक्षा कोणाच्या असतील तर त्या व्यक्तीकडे तिच्या मनासकट दुर्लक्ष करणं एवढी एकच गोष्ट शहाणा माणूस करू शकतो. 
पण बायकांच्या साध्या साध्या अपेक्षा पुरुष माणसांना का समजत नाहीत? याचं उत्तर फार जिव्हारी लागणारं आहे. की अनेक पुरुषांच्या दृष्टीने त्यांची बायको ही काही फारशी महत्वाची व्यक्ती नसते. त्यामुळे तिच्याबद्दल इतका विचारच ते करत नाहीत. पुरुषसत्ताक पद्धतीने त्यांना फुलप्रूफ कवचकुंडलं दिलेली आहेत, त्यामुळे समजा बायकोकडे फारसं लक्ष दिलं नाही तरी ती काही आपल्याला सोडून जाणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री असते. आपली बायको आनंदी आणि समाधानी असली पाहिजे, आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत हे त्यांना कोणी सांगितलेलंच नसतं. आणि त्यामुळेच त्यांना तिच्या मनातलं कधीही काहीही कळत नाही.
याच माणसांना ऑफिसमध्ये बॉसच्या मनातलं मात्र सगळं समजतं. एखाद्या ठिकाणी काम करून घ्यायचं असतं तेव्हा समोरच्याची नेमकी काय आणि कितीची अपेक्षा आहे हे आपोआप कळतं. अनेक ठिकाणी तर लग्न झाल्याच्या नंतर आणि बायको घरात आल्याच्या नंतर आईच्या मनातलं अचानक कळायला लागतं. आई दमली आहे हे दिसतं पण बायको दमली आहे हे दिसत नाही.
अर्थातच सगळे पुरुष असे नसतात आणि सगळ्या बायकाही अश्या नसतात. काही जणांचं आपल्या बायकोवर खरोखर इतकं प्रेम असतं की केवळ तिच्या दरवाजा उघडण्याच्या पद्धतीवरून त्यांना समजतं की तिचं काहीतरी बिनसलं आहे. आणि ते बिनसलेलं जे काही असेल ते नीट करण्यासाठी ते त्यांच्या बाजूने खरोखर प्रयत्न करतात. अश्या लोकांच्या बायका “मनातलं ओळखा” असे खेळ खेळतांना सहसा दिसत नाहीत. कारण त्यांच्या छोट्या छोट्या अपेक्षा आपोआप पूर्ण होतात. आणि मग मोठ्या अपेक्षा किंवा काही न समजलेल्या गोष्टी स्पष्ट सांगून करून घ्यायला त्यांचीही हरकत नसते. अशी घरं अधिक आनंदी असतात. अधिक समाधानी असतात.
आणि म्हणूनच बायकांच्या छोट्या छोट्या अपेक्षा न सांगता समजून घेणं याकडे पुरुषांनी परमार्थापेक्षाही स्वार्थ याच दृष्टीने बघितलं पाहिजे. कारण तिच्या दोन छोट्या अपेक्षा तुम्ही न सांगता अनपेक्षितपणे पूर्ण केल्यात तर तुमचंच आयुष्य अधिक सोपं होणार आहे.

Web Title: what exactly wife wants? unable to understand or men just don't give attention to expectations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.